ठाणे येथील अंबिकानगर भागातील एका घरात जबरदस्तीने शिरून ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग करणाऱ्या विजय गंगाधर सोनावणे याला बुधवारी ठाणे न्यायालयाने चार वर्षे तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विजयच्या नावावर विविध स्वरूपाचे १६ गुन्हे दाखल असून त्याची अंबिकानगर भागात दहशत होती. न्यायालयाने दिलेल्या शिक्षेनंतर त्याची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली.

अंबिकानगर भागात पीडित महिला राहत असून २४ फेब्रुवारी २०१५ रोजी ही महिला घरामध्ये एकटी होती. त्याचाच फायदा घेत विजय तिच्या घरामध्ये जबरदस्तीने शिरला आणि त्यानंतर त्याने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून वागळे इस्टेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ठाणे न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा गुप्ता यांच्या न्यायालयामध्ये विनयभंगाच्या खटल्याची सुनावणी सुरू होती. पीडित महिला आणि दोन साक्षीदारांची साक्ष न्यायालयामध्ये तपासण्यात आली. न्यायालयापुढे सादर करण्यात आलेले सर्व साक्षीपुरावे ग्राह्य़ मानून न्यायाधीश प्रतिभा गुप्ता यांनी विजयला या प्रकरणात दोषी ठरवून शिक्षा सुनावली, अशी माहिती वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मालेकर यांनी दिली.