News Flash

मूल पळवणाऱ्या महिलेला अटक

बनावट गिऱ्हाईक तयार करून एक लाख रुपयांचा सौदा नक्की केला.

पोलिसांनी या चिमुकल्याची सुटका केली.

घरकाम करणाऱ्या महिलेच्या सतर्कतेमुळे सुटका; आठ मुलांना विकल्याची माहिती

पळवून आणलेल्या दोन वर्षांच्या मुलाला एक लाख रुपयांना विकण्याचा एका महिलेचा प्रयत्न माणिकपूर पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी सापळा लावून या प्रकरणातील आरोपी महिलेला अटक केली असून चिमुकल्याची सुखरूप सुटका केली आहे. घरकाम करणाऱ्या एका महिलेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. या महिलेने याआधी आठ मुलांना पळवून विकले असल्याची खळबळजनक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

घरकाम करणारी एक महिला दररोज वसई रेल्वे स्थानकातून जात असते. दररोजचा रस्ता असल्याने या रस्त्यात नेहमी भेटणाऱ्या शगिना कय्युम मोहम्मद कुरेशी (४०) या महिलेशी तिची तोंडओळख होती. गेल्या काही दिवसांपासून शगिना एका लहान मुलाला घेऊन फिरत असल्याचे तिने पाहिले होते. त्याबाबत तिला विचारले असता, ‘हा मुलगा एक लाख रुपयांना विकायचा आहे. विकत घेणारी एखादी मालदार पार्टी मिळवून दे,’ असे तिने या महिलेला सांगितले. त्यामुळे घरकाम करणाऱ्या या महिलेला धक्का बसला. तिने तात्काळ माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना चौकशी करण्यास सांगितले. पोलिसांनी खातरजमा करून मंगळवारी रात्री सापळा रचला. बनावट गिऱ्हाईक तयार करून एक लाख रुपयांचा सौदा नक्की केला. रात्री दहा वाजता बाळाला विकत असताना पोलिसांनी शगिनाला अटक केली. दोन महिन्यांपूर्वी तिने हे बाळ पळवून आणले होते.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी याबाबत सांगितले की, आरोपी महिला ही मूळची बंगालची आहे. मीरा रोड परिसरातून हे मूल पळविल्याचे तिने सांगितले. मात्र नेमकी जागा दाखवू शकली नाही. गेल्या एक महिन्यांपासून ती हे बाळ विकण्याचा प्रयत्न करत होती. बाळ नेमके कुठून पळवले, कुणाचे आहे  याचा पोलीस शोध आहेत.  बुधवारी या महिलेला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. तिची कसून चौकशी सुरू आहे. तिने यापूर्वी विविध भागातून पळवून आणलेली आठ मुले विकल्याची माहिती दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. परंतु पोलीस त्याची खातरजमा करत आहेत.

बाळाचा शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन

बाळाचे वय दोन ते तीन वर्षे आहे. त्याची प्रकृती ठीक आहे. त्याचे छायाचित्र पोलिसांनी प्रसारित केले असून ज्या कुणाला बाळाच्या पालकांची माहिती आहे किंवा ज्यांचे हे बाळ आहे त्या पालकांनी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात २३३२११० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 3:51 am

Web Title: women arrested in child trafficking case
Next Stories
1 ‘त्या’ प्रस्तावांच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी रस्त्यावर
2 बिल्डरांना मैदान देण्याचा प्रस्ताव प्रशासनाचा
3 ठाण्यात आज रिक्षा-टॅक्सी बंद
Just Now!
X