रोखरहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी सुरू केलेल्या ‘लकी ग्राहक’ आणि ‘डिजीधन व्यापारी’ योजनेत महाराष्ट्रातील दोघींनी बाजी मारली आहे. त्यात ठाण्यातील ब्युटी पार्लर व्यावसायिक ‘लकी’ ठरली आहे. रागिनी उतेकर असे या ‘लकी’ व्यावसायिक महिलेचे नाव आहे. डिजीधन योजनेंतर्गत २५ लाख रुपये बक्षीस मिळाल्याचे फोन दिल्लीवरून येत होते. फसवे कॉल असल्याचा संशय आल्याने त्यांनी दुर्लक्ष केले. पण बँकेतून फोन आल्यानंतर आपल्याला २५ लाखांचे बक्षीस मिळाल्याची खात्री त्यांना पटली. नागपूरमधील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उतेकर दाम्पत्याचा सत्कार करून त्यांना २५ लाखांचा धनादेश दिला.

रागिनी उतेकर यांनी दागिने गहाण ठेवून ठाण्यात चार वर्षांपूर्वी ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीला क्वचितच त्यांच्या पार्लरमध्ये येणारे ग्राहक डिजिटल पेमेंट करत होते. डिजिटल पेमेंट करणाऱ्यांच्या संख्येत काही दिवसांनी वाढ होऊ लागली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. नोटाबंदीच्या काळात केंद्र सरकारने डिजीधन योजनेची घोषणा केली. देशातील जनतेने डिजिटल पेमेंट करावे, असे आवाहन केंद्र सरकारतर्फे करण्यात आले होते. तसेच रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी ग्राहक योजना आणि डिजीधन व्यापारी योजना सुरू केली. या योजनेनुसार डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांनाही बक्षीसे जाहीर करण्यात आली. डिजीधन व्यापारी योजनेंतर्गत रागिनी उतेकर या ‘लकी’ ठरल्या आहेत. उतेकर यांच्या पार्लरमध्ये एका ग्राहकाने ५१० रुपयांचे ब्युटीकचे साहित्य खरेदी केले होते. त्याचे पैसे कार्डद्वारे अदा करण्यात आले होते. केंद्र सरकारकडून काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये त्यांच्या डीजी पेमेंटचा क्रमांक निवडला गेला. डिजीधन योजनेंतर्गत २५ लाखांचे बक्षीस मिळाल्याची माहिती देणारे फोन दिल्लीहून येत होते. पण फसवणुकीचे कॉल असल्याचा संशय आल्याने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केल्याचे उतेकर यांनी सांगितले. पण त्यानंतर बँकेतूनच फोन आल्याने आपल्याला २५ लाखांचे बक्षीस मिळाले आहे, याची खात्री पटली. बँकेत गेल्यानंतर व्यवस्थापकाने नागपूर येथे होणाऱ्या डिजीधन मेळाव्याला जाण्याची व्यवस्था केली. विमानाचे तिकीट आणि तेथे पोहोचल्यानंतर हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली, अशी माहिती उतेकर यांनी दिली. नागपूर येथे काल पार पडलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उतेकर दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना २५ लाखांचा धनादेश देण्यात आला.