ठाण्यातील ‘आरना फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणच्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबातील महिलांना ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ‘सॅनिटरी नॅपकीन’चे वाटप करण्यात येणार आहे. ‘सॅनिटरी नॅपकीन दत्तक’ असे या उपक्रमाचे नाव आहे. या उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी १५०० हून अधिक महिलांना प्रत्येकी दोन सॅनिटरी नॅपकीन पाकिटांचे वाटप करण्यात आले होते.

आरना फाऊंडेशन ही संस्था गेल्या चार वर्षांपासून निरनिराळे सामाजिक उपक्रम राबवत आहे. समाजातील आर्थिकदृष्टय़ा गरीब घरातील महिला त्यांच्या मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकीनचा वापर करत नाहीत, हे फाऊंडेशनमध्ये कार्यरत असलेल्या तरुण-तरुणींच्या लक्षात आले. भारतासारख्या विकसनशीन देशात महिलांना त्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असणाऱ्या गोष्टी त्यांना महिन्यातून किमान पाच दिवस विकत घेता येत नाहीत, ही अतिशय चिंताजनक बाब आहे, असे आरना या संस्थेत काम करणाऱ्या मुला-मुलींना वाटले आणि त्यांचा हा प्रवास सुरू झाला. त्यांनी महिलांसाठी ‘सॅनिटरी नॅपकीन दत्तक’ हा उपक्रम सुरू केला. यंदाच्या ८ मार्च रोजी होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे पूर्व भागातील कचराभूमी असणाऱ्या मैदानाजवळ असणाऱ्या झोपडपट्टीतील मुलींना या सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करून उपक्रमाची सुरुवात होणार आहे. तसेच नवी मुंबई, ठाण्यातील वागळे इस्टेट आणि आंबेवाडी, भिवंडी, भाईंदर, अंधेरी या ठिकाणी असणाऱ्या काही गरीब लोकवस्त्यांमधील स्त्रियांना या सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात येणार आहे.

या संस्थेत काम करणारे तरुण-तरुणी हे स्त्रियांना सॅनिटरी नॅपकीनच्या सुयोग्य वापराविषयी योग्य असे मार्गदर्शनही करणार आहेत. यंदाच्या वर्षी १० हजारांहून अधिक निधी या उपक्रमासाठी समाजातील निरनिराळ्या व्यक्तींकडून सामाजिक माध्यमाद्वारे जमा झालेला आहे. तसेच वाटण्यात येणारे सॅनिटरी नॅपकीन हे पर्यावरणपूरक असून मातीत टाकल्यानंतर ते अवघ्या तीन महिन्यांत नष्ट होऊन जातात. त्यामुळे पर्यावरणाला कोणातीही धोका पोहचत नाही असे हे सॅनिटरी नॅपकीन आहेत.

संस्थेचे विश्वस्त श्वेता सरोज, संचालक सनी सरोज आणि उपसंस्थापक चिनू कवात्रा यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला आहे.