राज ठाकरे यांची सभा पिवळ्या रंगाने झाकोळली

वसई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वसईतील जाहीर सभेसाठी पिवळ्या रंगाच्या खुर्च्या वापरण्यात आल्याने सभा पिवळ्या रंगाने झाकोळली गेली. पिवळा रंग हा वसईतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडी पक्षाचा असल्याने त्यांनी ही सभा हायजॅक केल्याची चर्चा वसईत रंगली आहे. या पिवळ्या रंगाच्या वातावरणामुळे सभा ठाकरेची की ठाकूरांची असा प्रश्न विचारला जात होता. ही चूक उशिरा लक्षात आल्याने मनसे नेत्यांना केवळ सारवासारव करण्यावाचून काही इलाज उरला नव्हता.

आम्ही या सर्व खुर्च्या बदलून टाकू असे मनसेचे नेते प्रशात खांबे यांनी सांगितले होते. परंतु ते शक्य नसल्याने त्यांनी माघार घेतली. बहुजन विकास आघाडीच्या रंगावर बसून त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी पिवळा रंग वापरल्याची सारवासारव मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली. हा प्रकार ठेकेदाराने मुद्दाम केल्याने मनसे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. तर बहुजन विकास आघाडी या प्रकारामुळे  मनात मांडे खात आहे.

‘चूक ठेकेदाराची ’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात पालघर जिल्ह्यतून होत आहे. पहिली सभा वसईतील चिमाजी अप्पा मैदानावर संपन्न झाली. ठेकेदाराना मंडप आणि खुर्च्याचे काम देण्यात आले. परंतु ठेकेदाराने खुर्च्या पांढऱ्या रंगाऐवजी पिवळ्या रंगाच्या आच्छादन असलेल्या आणल्या तसेच शामियाना देखील पिवळ्या रंगाचा उभारला. पिवळा रंग हा सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचा आहे. वसईतील प्रत्येक कार्यक्रमात पिवळा रंग वापरला जातो. ही बाब सोमवारी आयोजकांच्या लक्षात आली आणि त्यांनी ठेकेदाराला धारेवर धरले.