वडिलांनी बूट पॉलिश करायला सांगितले म्हणून घरातून पळालेला मध्य प्रदेशातील इंदूरचा रहिवासी प्रवीण भाटी (१९) हा ठाणे वाहतूक पोलिसांना सापडला. गुरुवारी सायंकाळी त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
इंदूरमधील एका महाविद्यालयात प्रवीण अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांला शिकत आहे. मंगळवारी मोटारसायकल घेऊन महेश बाहेर पडला होता. धुळे, मालेगाव, शिर्डी, नाशिक, शहापूर असा सुमारे सातशे किलोमीटरचा प्रवास करून गुरुवारी तो ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. ठाणे वाहतूक शाखेच्या वर्तकनगर युनिटचे पोलीस कर्मचारी कैलास अहिरे यांनी कॅडबरी नाक्यावर त्याला हेल्मेट नसल्याने अडवले. त्याच्याकडे वाहन परवानाही नव्हता. त्याला पोलीस निरीक्षक दत्तात्रय पालवे यांच्याकडे नेल्यानंतर त्याची चौकशी केली असता, त्याने घरातून पळून आल्याची कबुली दिली. त्याचे पालक आणि इंदूर पोलीस त्याच्या शोधात नाशिकपर्यंत पोहाचले होते. मात्र पुढे त्यांना तपासात दिशा मिळत नव्हती. पालवे यांनी त्यांच्या पालकांशी संपर्क साधून प्रवीण त्याच्या ताब्यात असल्याची माहिती दिली.