नीलेश पानमंद

गेल्या दीड महिन्यापासून करोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन ठाणे महापालिकेने पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास येथे तातडीने रुग्णालये उभारून रुग्णांसाठी दोन हजार खाटांची व्यवस्थाही केली. मात्र, या दोन्ही रुग्णालयांना ऑक्सिजन अर्थात प्राणवायूचा पुरवठा झाला नसल्याने ती सुरू करता आलेली नाहीत. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येचा भार अजूनही महापालिकेच्या ग्लोबल आणि अन्य खासगी रुग्णालयांवरच येत आहे. परिणामी रुग्णांना खाटा मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ९७ हजार १३१ करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ७९ हजार ५२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत १ हजार ४५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शहरात सद्य:स्थितीत १६ हजार १५२ सक्रिय करोना रुग्ण आहेत. त्यापैकी चार हजारांच्या आसपास रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तर उर्वरित रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. शहरातील पालिका आणि खासगी रुग्णालयांत एकूण ४ हजार ४९९ खाटा उपलब्ध असून त्यामध्ये प्राणवायूच्या २ हजार ५५४, अतिदक्षता विभागातील ६४४ आणि व्हेंटिलेटरच्या २४० खाटांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत अनेक रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता भासत असून यामुळे प्राणवायूच्या १४ ते १५ टक्के, तर अतिदक्षता विभागाच्या दहा ते १२ टक्के खाटा शिल्लक आहेत. मात्र, त्या तुलनेत रुग्णांची संख्या किती तरी जास्त असल्याने उपलब्ध खाटा मिळवताना रुग्णांची आणि त्यांच्या आप्तेष्टांची दमछाक होत आहे.

महापालिका प्रशासनाने माजिवाडा भागातील पार्किंग प्लाझामध्ये ११५०, तर पोखरण रोड भागात व्होल्टास कंपनीच्या जागेवर ११५० खाटांचे करोना रुग्णालय तातडीने उभारले. ही रुग्णालये रुग्ण उपचारासाठी सज्ज असून यापैकी पार्किंग प्लाझा रुग्णालय सुरूही करण्यात आले होते. परंतु त्या ठिकाणी प्राणवायूचा पुरवठा होत नसल्यामुळे तेथील रुग्ण पालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात हलविण्यात आले. तेव्हापासून हे रुग्णालय बंद आहे. पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास ही दोन्ही रुग्णालये प्राणवायूच्या पुरवठ्याच्या प्रतीक्षेत असून यामुळे येथे रुग्ण उपचार सेवा अद्याप सुरू होऊ शकलेली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

रुग्णभार वाढला

पालिकेच्या ग्लोबल रुग्णालयामध्ये २० टनांची प्राणवायूची क्षमता असलेली टाकी आहे. या ठिकाणी दिवसातून तीन वेळा प्राणवायू भरावा लागत असून सद्य:स्थितीत येथे प्राणवायूचा पुरवठा होत आहे. असे असले तरी शहरात दररोज वाढणाऱ्या रुग्णांच्या उपचारांसाठी पुरेशी सुविधा नसल्यामुळे रुग्णांचा भार पालिकेच्या ग्लोबल आणि खासगी रुग्णालयांवर पडू लागला असून यामुळे या रुग्णालयांनाही प्राणवायूच्या तुटवड्याची समस्या जाणवू लागली आहे.

रुग्णालयाचे नाव खाटा   प्राणवायू क्षमता  वारंवारिता

ग्लोबल रुग्णालय १२५०   २० किलोलिटर   २ दिवसांतून ३ वेळा

पार्किंग प्लाझा   ११५०   १३ किलोलिटर   २ दिवसांतून ३ वेळा

व्होल्टास रुग्णालय   ११५०   १३ किलोलिटर   २ दिवसांतून ३ वेळा

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल करोना रुग्णालयात सद्य:स्थितीत प्राणवायूचा पुरवठा होत आहे. तर पालिकेच्या पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा पुरवठा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून त्याची शाश्वती झाल्यानंतर ती रुग्णालयेही लगेचच सुरू करण्यात येतील.

– गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका