मतदारसंख्येत दीड लाखांची वाढ

नालासोपाऱ्यात सर्वाधिक मतदार; वसईतील मतदारसंख्येत चार हजारांची घट

प्रतिनिधिक छायाचित्र

नालासोपाऱ्यात सर्वाधिक मतदार; वसईतील मतदारसंख्येत चार हजारांची घट

पालघर पोटनिवडणूक

वसई : पालघर लोकसभा मतदारसंघात २०१४च्या तुलनेत तब्बल दीड लाखांनी मतदार वाढले आहेत. २०१४मध्ये १५ लाख ७७ हजार मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात आता १७ लाख २४ हजार मतदार झाले आहेत. नालासोपारा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ८१ हजार मतदार वाढले असून ४ लाख २९ हजार मतदार असलेला हा जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ ठरला आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण वसई, नालासोपारा, बोईसर, पालघर, डहाणू, विक्रमगड असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१४ मध्ये या लोकसमभा मतदारसंघाची मतदारसंख्या १५ लाख ७७ हजार ९०९ होती. गेल्या चार वर्षांत जिल्ह्यातील लोकसंख्या वाढली आणि मतदारांचे प्रमाणही वाढले. जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीनुसार २०१४ च्या तुलनेत १ लाख ४६ हजार ९७ मतदारांची संख्या वाढली आहे.

सर्वाधिक म्हणजे ८१ हजार मतदारांची वाढ ही नालासोपारा मतदारसंघात झाली आहे. त्यामुळे २०१४ रोजी ३ लाख ४८ हजार १८६ मतदार असलेल्या नालासोपारा मतदारसंघात ८१ हजारांची भर पडून मतदारसंख्या आता  ४ लाख २९ हजार २७३ एवढी झाली आहे. वसई मतदारसंघातील मतदार मात्र ४ हजार ३०१ने घटले आहे.

कमी मतदानाची भीती

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. पालघर जिल्ह्यात सुटी जाहीर केली असली तर कामानिमित्त दररोज बाहेर जाणाऱ्या मतदारांना कामाच्या दिवशी येऊन मतदान करण्याची शक्यता नाही. मे महिना असल्याने अनेक मतदार गावी गेले आहेत. राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही गावी आणि फिरायला गेलेले आहेत. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ६५ टक्के मतदान झाले होते.

नालासोपाऱ्यावर लक्ष

नालासोपारा मतदारसंघ हा मतदारसंख्येनुसार सर्वात मोठा असल्याने राजकीय पक्षांनी याच मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. सर्वच मोठय़ा नेत्यांच्या सभा, प्रचारसभा याच मतदारसंघात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या मतदारसंघात प्रचारसभा घेणार आहेत.

मतदारसंख्या कितीने वाढली?

डहाणू :            २०,५३७

विक्रमगड :     ११,०५१

पालघर :       २५,९३१

बोईसर :       ११,७९२

नालासोपारा :    ८१,०८७

वसई :  ४,३०१ मतदार घटले.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या

मतदारसंघ            २०१४            २०१८

डहाणू                २,३०,९०१       २,५१,४३८

विक्रमगड           २,४२,१३३       २,५३,१८४

पालघर              २,३२,८६०       २,५८,७९१

बोईसर              २,४५,२२४       २,५७,०१६

नालासोपारा     ३,४८,१८६       ४,२९,२७३

वसई                २,७८,६०५       २,७४,३०४

एकूण मतदार    १५,७७,९०९      १७,२४,००६

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 1 lakhs 50 thousand voters increased in palghar constituency