गेल्या दोन वर्षांपासून पालिकेचा स्थानिक स्वराज्य संस्था कर थकविणाऱ्या १२१ जणांनी पालिका निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी केलेल्या छाननीत स्पष्ट झाली आहे.
व्यापारी, व्यावसायिक असलेले हे बहुतेक उमेदवार इमारत बांधकामाच्या साहित्याचे पुरवठादार आहेत, तर काही दुकानदार आहेत. सीमेंट, लोखंड, पत्रे या शहरात आणलेल्या साहित्यावर या मंडळींनी एलबीटी भरणा केला नसल्याचे समजते. उमेदवारी अर्ज भरताना त्याच्याकडे पालिकेची कोणत्याही प्रकारची थकबाकी नसल्याची प्रमाणपत्रे जोडावी लागतात. अनेक उमेदवारांनी मालमत्ता, पाणी व इतर सर्व करभरणा केला असल्याची माहिती उमेदवारी अर्जासोबत जोडली आहे. उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांमध्ये अनेक उमेदवार हे व्यावसायिक, व्यापारी असल्याचे एका जाणकाराला आढळले. त्यांनी पालिका प्रशासनाला याबाबत पत्र दिल्यानंतर प्रशासनाने अशा उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. अन्य रकमेचा कर भरणा नसल्याची जशी प्रमाणपत्र या उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिली. तशीच एलबीटी भरणा केली असल्याची माहिती या उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी. एलबीटी थकविणाऱ्या व्यापाऱ्यांकडून हा कर वसूल करण्याची हीच वेळ आहे. पालिकेने निवडणुकीची संधी साधून संबंधित उमेदवारांकडून एलबीटी वसूल करण्यासाठी हालचाली सुरू कराव्यात, अशी मागणी एका जाणकाराने पालिका प्रशासनाकडे केली आहे.