डोंबिवली शहर स्वच्छ, सुरक्षित, आरोग्यमय व्हावे असा विडा उचलत ‘व्हिजन डोंबिवली’ संस्थेतर्फे रविवारी शहरात स्वच्छतेचा जागर करण्यात आला. या उपक्रमात शहरातील ५३ संस्थांचे कार्यकर्ते आणि सुमारे दीड हजार रहिवाशी सहभागी झाले होते. आपले शहर आपणच स्वच्छ ठेवायचे आहे, असा संदेश सायकल यात्रा, पदयात्रेच्या माध्यमातून यावेळी शहरवासीयांना देण्यात आला.
अस्वच्छ शहरांमध्ये कल्याण-डोंबिवलीचा समावेश झाल्याने सांस्कृतिकतेचा टेंभा मिरविणाऱ्या या शहरांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. अस्वच्छतेचा शिक्का बसल्याने अस्वस्थ झालेल्या डोंबिवलीतील विविध क्षेत्रांतील काही निवडक मंडळींनी एकत्र येऊन ‘व्हिजन डोंबिवली’ हा गट स्थापन केला आहे. या गटाच्या माध्यमातून शहर स्वच्छतेसाठी एक नियमावली तयार करण्यात आली आहे. या संस्थेने आयोजित केलेल्या स्वच्छतेच्या जागरात युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक, पर्यावरण प्रेमी, विकासक, वास्तुविशारद, स्ट्रक्चरल अभियंते, शिक्षण संस्था, महिला संघटना, डॉक्टर, वकील अशा क्षेत्रातील मंडळी सहभागी झाले होते.
दोन महिन्यांपासून शहर स्वच्छतेबाबतची आखणी करण्यासाठी ‘व्हिजन’ गटाच्या बैठका सुरूहोत्या. शहर स्वच्छतेबाबतची अंतिम नियमावली तयार झाली आहे. ती अधिकाधिक लोकापर्यंत पोहाचावी, मोठय़ा संख्येने डोंबिवलीकरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी व्हिजन डोंबिवलीचे ‘संकेतस्थळ’ सुरू करण्यात आले आहे. तसेच, ‘व्हिजन डोंबिवली’ हे मोफत डाऊनलोड करता येऊ शकेल असे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या शुभारंभाचा कार्यक्रम रविवारी भागशाळा मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. व्हिजन डोंबिवली उपक्रमात अधिक रहिवाशांनी सहभागी व्हावे म्हणून डोंबिवली पूर्व भागातील फडके रस्त्यावरून एक सायकल फेरी भागाशाळा मैदानापर्यंत काढण्यात आली. विविध क्षेत्रातील मान्यवर या फेरीत सहभागी झाले होते. भागशाळा मैदानातील जाहीर कार्यक्रमाला महापौर राजेंद्र देवळेकर, ‘व्हिजन’चे समन्वयक डॉ. उल्हास कोल्हटकर, साहाय्यक पोलीस आयुक्त घाटगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंद्रजित कार्ले, प्रज्ञेश प्रभुघाटे, डॉ. नितीन जोशी, अभिजीत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक संदेश
कचरा, पाणी विषयावर जनजागृती करणाऱ्या नाटिका सादर करण्यात आल्या. मॉडेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाटय़ सादर केले. पर्यावरण प्रदूषणाबाबत जागृत असणारे हेरंब म्युझिक संस्थेचे रवी पोंक्षे व ज्येष्ठ गायिका डॉ. मृदुला दाढे जोशी यांच्या पुढाकाराने गायक निरगुडकर, गायिका गौरी कवी मिरजगावकर, पोंक्षे यांच्या गायनाचा कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. स्वसुरक्षिततेची प्रात्यक्षिके पूर्वा मॅथ्यु यांच्या चमूने सादर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपक्रमाला निधी – महापौर
शहर स्वच्छता हे पालिकेचे कर्तव्य आहे. शहरातील अस्वच्छता नागरिक म्हणून आपण आटोक्यात आणावी. यासाठी शहरातील विविध क्षेत्रांतील रहिवासी एकत्र येऊन शहर स्वच्छता करीत असतील तर महापालिकेच्या कामाला ते हातभार लावीत आहेत. शहर स्वच्छता ही काळाची गरज आहे. त्यामुळे व्हिजन डोंबिवलीने शहर स्वच्छतेसाठी जे पाऊल उचलले आहे. त्या उपक्रमाला महापालिकेडून सर्व प्रकारची मदत करण्यात येईल. त्याचबरोबर या गटाच्या मागणीनुसार महापालिका फंडातून विशेष साहाय्य स्वच्छता उपक्रमाला देण्यात येईल, असे आश्वासन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी यावेळी दिले. कल्याणमध्येही असाच उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. शहर स्वच्छतेसाठी शहरवासीय एकत्र आले आहेत. हा उपक्रम अधिक गतीने पुढे जावा. शहर लवकर स्वच्छ होण्यास आपला पण हातभार असावा म्हणून डोंबिवलीतील अखिल भारतीय महिला संघटनेच्या अध्यक्षा सुषमा शेंडे यांनी आपल्या वैयक्तिक निधीतून व्हिजन डोंबिवली उपक्रमाला ५१ हजारांची देणगी जाहीर केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1500 dombivali residents participate in cleaning campaign
First published on: 19-04-2016 at 04:16 IST