लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई-एमसीएचआय ठाणे या संस्थेने भरविलेल्या चार दिवसीय मालमत्ता प्रदर्शनाला ३० हजार २१७ जणांनी भेट देऊन गृहप्रकल्पांची माहिती घेतली. त्यापैकी २१७ जणांनी घरांची खरेदी केली असून त्याचबरोबर मालमत्ता प्रदर्शनात सहभागी झालेल्या बँका व गृहकर्ज वित्तीय संस्थांनी १२५० कोटींचे गृहकर्ज वाटप केले आहे. त्यामुळे यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठाणे येथील पोखरण रोड क्रमांक १ वरील रेमंड कंपनीच्या मैदानात क्रेडाई-एमसीएचआय ठाणे या संस्थेने मालमत्ता प्रदर्शन भरविले होते. या प्रदर्शनात १६ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० यावेळेत हे प्रदर्शन सुरू होते. या प्रदर्शनात ठाणे शहरातील शंभरहून अधिक गृहप्रकल्पातील घरे विक्रीसाठी ठेवण्यात आली होती तर, ५० हून अधिक बांधकाम व्यावसायिक आणि १५ हून अधिक बँका व गृहकर्ज वित्तीय संस्था सहभागी झाल्या होत्या. या प्रदर्शनामध्ये परवडणारी, मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय अशा सर्वांचा विचार करून ४० लाखांपासून ते ४ कोटी रुपयांपर्यंतच्या घरांबरोबरच व्यावसायिक वापरासाठी कार्यालयांचे पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले होते. शिवाय, मुंबई, बदलापूर, नेरळ, बदलापूर भागातील घरे आणि नवी मुंबई विमानतळ परिसरात बंगलो प्लॉटचे पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले होते.

आणखी वाचा-कल्याणमध्ये क्रिकेट खेळण्यावरून विद्यार्थ्याला मारहाण

या प्रदर्शनात ठाणे महापालिकेच्या स्टॉलवर व्ही.आर कंपनीच्या माध्यमातून ठाणे शहराची आभासी पद्धतीने हेलिकॉप्टर सैर केली जात होती. यंदाच्या प्रदर्शनाला २० हजाराहून अधिक ग्राहक भेट देतील अशी शक्यता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वर्तविली होती. परंतु त्यापेक्षाही जास्त म्हणजेच ३० हजार २१७ जणांनी गेल्या चार दिवसांत मालमत्ता प्रदर्शनाला भेटी दिल्या. त्यापैकी २१७ जणांनी घरांची खरेदी केली असून त्याचबरोबर मालमत्ता प्रदर्शनात सहभागी झालेल्या बँका व गृहकर्ज वित्तीय संस्थांनी १२५० कोटींचे गृहकर्ज वाटप केले आहे. या प्रदर्शनाला भेट देता न आलेल्या इच्छूक ग्राहकांसाठी यंदाचे मालमत्ता प्रदर्शन ऑनलाईनद्वारे पुढील वर्षभर भरविण्याचे ठरविले आहे. इच्छूक ग्राहकांना http://www.credaimchi.com या वेबसाईटवर प्रदर्शन पाहता येईल, अशी माहिती संस्थेकडून देण्यात आली.

ठाणे शहर हे सांस्कृतिक, सामाजिक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उत्तम शहर आहे. मुंबई महानगर क्षेत्रात ठाणे शहराने नावलौकिक संपादन केला आहे. शहरातील बांधकाम क्षेत्रानेही अपेक्षित विकास केला असून, ग्राहकांच्या अपेक्षा व गरजेनुसार घरांबरोबरच उत्तम जीवनशैली असलेली घरे उपलब्ध केली आहेत. घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ठाणे शहर हा उत्तम पर्याय ठरला आहे, अशी प्रतिक्रिया `क्रेडाई एमसीएचआय, ठाणे चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीत विद्यार्थ्याला मारहाण करणारे आरोपी मोकाट, ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार

ठाणे शहरात बांधकाम क्षेत्राचा विकास वेगाने होत असून, ते गुंतवणूकदारांच्या दृष्टीने महत्वाचे शहर झाले आहे. ठाण्यातील गुंतवणुकीला उत्तम परतावा मिळत असून, नवनवीन उत्तमोत्तम प्रकल्प शहरात साकारले जात आहेत. गेल्या २० वर्षांत `क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’ यांच्या प्रॉपर्टी प्रदर्शनाने नागरिकांना घरखरेदीसाठी उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे, असे प्रदर्शन समितीचे अध्यक्ष संदीप माहेश्वरी यांनी सांगितले.