कल्याण-डोंबिवली शहरांचा चेहरामोहरा बदलणार; वाहतूक रस्ते, उड्डाणपुलांना प्राधान्य 

कल्याण-डोंबिवली शहरात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत पालिकेने १४४१ कोटीचे २५ प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. या प्रकल्पांसाठी केंद्र, राज्य शासनाकडून एक हजार कोटीचा निधी उपलब्ध होणार आहे. ३०० कोटीचा निधी पालिकेला शासनाकडून प्राप्त झाला असून तीन टप्प्यात विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. दरवर्षी २०० कोटी प्रमाणे येत्या पाच वर्षांत एक हजार कोटीचा निधी पालिकेला ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत विकास प्रकल्प राबविण्यासाठी मिळणार आहे.

अधिकाधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन राहणीमानाचा दर्जा उंचावणे, हा स्मार्ट सिटीचा मुख्य उद्देश आहे. पालिका हद्दीत ‘स्मार्ट सिटी’चे प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाल्यानंतर या प्रकल्पांचे विशेष आराखडे, सर्वेक्षण, प्रकल्प अंमलबजावणीचे नियोजन करण्यासाठी ‘विशेष वहन परियोजन’साठी (स्पेशल पर्पज व्हेईकल) एक कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पांसाठी पालिकेला स्वनिधीतून उपलब्धतेप्रमाणे ४४० कोटीचा निधी उभारायचा आहे. ‘स्मार्ट सिटी’चे प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पांचे आराखडे, नियोजन, निविदा प्रक्रिया, त्यांचे कार्यादेश आणि प्रकल्प अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

कल्याण, डोंबिवली शहरांची नागरी सुविधांची अत्यावश्यक गरज ओळखून पायाभूत प्रकल्प ‘स्मार्ट सिटी’ यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. शहराची प्रथम गरज काय आहे, ते ओळखून कल्याण रेल्वे स्थानक विकास, रस्ते जाळे, कचरा प्रकल्प, मनोरंजन नगरी सारखे महत्वपूर्ण प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यात आले आहेत, असे

स्मार्ट सिटी, कडोंमपाचे प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांनी सांगितले. कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथे ६४ कोटी खर्चाच्या सिटी पार्क (नगर उद्यान) विकास कामाला सुरुवात झाली असून कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक विकासाची निविदा प्रक्रिया सुरू करून २० ऑक्टोबपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात स्कायवॉक, अद्ययावत वाहनतळ, चारचाकी आदी कामे केली जाणार असल्याची माहितीही जुनेजा यांनी दिली.

प्रस्तावित प्रकल्प आणि खर्च

* कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसर सुधारणा करणे ४२७ कोटी.

* उंबर्डे येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प राबविणे १९० कोटी

* कल्याणमध्ये नगर उद्यान विकसित करणे ११० कोटी

* रस्ते जाळे विकास आणि चौक विकास ९१ कोटी

* खाडी किनाऱ्यांचे सुशोभीकरण ६४ कोटी

* सौरऊर्जा जाळे जोडणी सयंत्र उभारणे २० कोटी

* तलावांचे पुनरुज्जीवन करणे ४० कोटी

* तारांकित शहर प्रकल्पांमध्ये भौतिक सुविधा ११४ कोटी

* पाणीपुरवठा व्यवस्थेचे आधुनिकीकरण ३० कोटी

* वाहतूक व्यवस्था सुधारणा करणे ३२ कोटी

* आधारवाडी क्षेपणभूमी बंद करणे २८ कोटी

* वाडेघर, उंबर्डे येथे बायोगॅस प्रकल्प दोन कोटी (रक्कम रुपयांत)