scorecardresearch

डोंबिवलीत ‘सरींवर सरीं’चा शनिवारी त्रिदशकपूर्ती सोहळा; महाराष्ट्रासह इतर प्रांतात पाऊस गितांचे ५०० हून अधिक कार्यक्रम

मागील ३० वर्ष पाऊस गितांनी रसिकांना ओथंबून टाकणाऱ्या ‘सरींवर सरी’ या कार्यक्रमाचा त्रिदशकपूर्ती सोहळा येत्या शनिवारी (ता.१३) डोंबिवलीत आयोजित करण्यात आला आहे.

डोंबिवलीत ‘सरींवर सरीं’चा शनिवारी त्रिदशकपूर्ती सोहळा; महाराष्ट्रासह इतर प्रांतात पाऊस गितांचे ५०० हून अधिक कार्यक्रम
डोंबिवलीत ‘सरींवर सरीं’चा शनिवारी त्रिदशकपूर्ती सोहळा

डोंबिवली- मागील ३० वर्ष पाऊस गितांनी रसिकांना ओथंबून टाकणाऱ्या ‘सरींवर सरी’ या कार्यक्रमाचा त्रिदशकपूर्ती सोहळा येत्या शनिवारी (ता.१३) डोंबिवलीत आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ गायिका व संगीत शास्त्राच्या अभ्यासक डाॅ. मृदुला दाढे-जोशी, ज्येष्ठ गायक दिवंगत विनायक जोशी हे ‘सरींवर सरी’ कार्यक्रमाचे अध्वर्यू. या कार्यक्रमाला बहारदार आवाजाचे दिवंगत भाऊ मराठे यांचे निवेदन असायचे. पावसाचे तीन महिेने या कार्यक्रमाची महाराष्ट्रासह इतर प्रांतात बरसात असायची. आतापर्यंत या कार्यक्रमाचे ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत, अशी माहिती या कार्यक्रमाच्या संयोजिका डाॅ. मृदुला दाढे-जोशी यांनी दिली.

या कार्यक्रमातील एक महत्वाचा दुवा ज्येष्ठ गायक विनायक जोशी यांचे दोन वर्षापूर्वी निधन झाले. त्यांच्या स्मृतिला अभिवादन आणि ‘सरींवर सरी’ कार्यक्रमाचा त्रिदशकपूर्ती सोहळ्यानिमित्त डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्यावरील सर्वेश सभागृहात शनिवारी (ता.१३) संध्याकाळी साडे सहा वाजता पाऊस सरींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ संगीतकार वसंत आजगावकर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

सरींचा उगम

१९९२ मध्ये चतुरंग प्रतिष्ठानतर्फे पनवेल जवळील डोंबाळे गावात वर्षा सहल काढण्यात आली होती. मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसात वर्षा सहलीचा आनंद घेत असताना विनायक आणि मी (मृदुला दाढे-जोशी) पावसाची रुपक कुलकर्णीसह मोजके वादक घेऊन विविध गाणी गायली. हा कार्यक्रम रसिकांनी उचलून धरला. या वर्षा सहलीतील गाण्यांमधून विनायक जोशींच्या संकल्पनेतील ‘सरींवर सरी’ पाऊस गितांच्या कार्यक्रमाचा जन्म झाला, असे गायिका डाॅ. मृदुला यांनी सांगितले.

खर्जातील आवाजाचे भाऊ मराठे यांचे निवदेन या कार्यक्रमाला होते. ‘रसिकहो नमस्कार’ असा शब्दोच्चार भाऊंनी करताच काही क्षण सभागृहात स्तब्धता पसरून पुढील तीन तास सरींवर सरीमधील पाऊस गिते धुवाधार गायली जात होती. या गितांमध्ये रसिक ओथंबून जाऊन कार्यक्रम टिपेला कधी गेला हे कोणाला कळत नव्हते. गिरीश प्रभू, संदीप मयेकर, संजय मयेकर, अजित जोशी, रामचंद्र शेणाॅय या चमूची संगीतसाथ या कार्यक्रमाला होती.

पावसाळ्यातील तीन महिने गायक, वादकांचा चमू सरींच्या कार्यक्रमात व्यस्त असे. महाराष्ट्रासह जबलपूर, इंदोर, बडोदा, बेळगाव येथील महाराष्ट्र मंडळ, संगीत संस्थांच्या माध्यमातून हे कार्यक्रम आयोजित केले जात होते.

गीत रचना

ज्येष्ठ कवी, साहित्यिक शंकर वैद्य, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, कवी ग्रेस, गदिमा, आरती प्रभू, बा. भ. बोरकर, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, पं. हदयनाथ मंगेशकर या प्रतिभावान कवी, संगीतकारांच्या रचना या कार्यक्रमात सादर केल्या जात होत्या. समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला पाचवा महिना, मेघ सावळा फुलारुनिया विरघळला, कलत्या रवीचे उन विंचरीत आल्या श्रावण सरी, मयुरा रे, सये पहा ढगांवर, भरल आभाळ अशी गाणी, लावण्या या कार्यक्रमात सादर केल्या जात होत्या.

विनायक जोशींचे स्मरण

इंदोर येथील गाण्यांचा कार्यक्रम आटोपून माघारी येत असताना अचानक विनायक जोशी यांचे हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. सरींच्या कार्यक्रमातील महत्वाचा दुवा निखळला. दोन वर्ष करोना महासाथीमुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. विनायक यांचे स्मरण आणि रसिकांची आग्रही मागणी यामुळे येत्या शनिवारी पूर्णिमा जोशी, गंधार जोशी, गेयश्री जोशी यांच्या सहकार्याने डाॅ. मृदुला दाढे, नीलेश निरगुडकर, मिलिंद जोशी, मनीषा जोशी हे गायक ज्येष्ठ निवेदिका दीपाली केळकर यांच्या निवेदनाच्या साहाय्याने सरींचा कार्यक्रम सादर करणार आहेत.

सरींचा कार्यक्रम सुरू होऊन आता ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. ५०० हून अधिक कार्यक्रम पाऊस गितांचे झाले आहेत. या कार्यक्रमातील मुख्य दुवा विनायक जोशी यांचे निधन, महासाथीमुळे दोन वर्ष हा कार्यक्रम होऊ शकला नाही. रसिकांचा आग्रह, या कार्यक्रमाची त्रिदशकपूर्ती निमित्त हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

डाॅ. मृदुला दाढे-जोशी, ज्येष्ठ गायिका

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या