scorecardresearch

मुंबईतील डाॅक्टरची डोंबिवलीतील स्वस्थम आयुर्वेदच्या संचालकांकडून ८५ लाखाची फसवणूक

डाॅ. आशीष यांना आपली फसवणूक होत आहे असे लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या मूळ रकमेसह त्यावरील परतावा देण्याची मागणी सुरू केली.

मुंबईतील डाॅक्टरची डोंबिवलीतील स्वस्थम आयुर्वेदच्या संचालकांकडून ८५ लाखाची फसवणूक
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

कल्याण : ‘तुम्ही आमच्या स्वस्थम आयुर्वेद कंपनीत गुंतवणूक करा. तुम्हाला वार्षिक ४८ टक्के वार्षिक परतावा देतो. त्याप्रमाणे मुंबईतील ट्राॅम्बे येथील एक डाॅक्टरने डोंबिवली पूर्वेतील सोनारपाडा येथे कार्यालय असलेल्या स्वस्थम आयुर्वेद कंपनीमध्ये गुंतवणूक स्वरुपात ८५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. स्वस्थमच्या संचालकांनी सुरुवातीला डाॅक्टरचा विश्वास संपादन करुन त्यांना आकर्षक परतावा दिला. गेल्या तीन महिन्यापासून डाॅक्टरना आकर्षक परतावा नाहीच, पण मूळ रक्कमही संचालक परत करत नसल्याने आपली फसवणूक आणि आपल्या रकमेचा अपहार स्वस्थमच्या संचालकांनी केला असल्याची तक्रार डाॅक्टरने मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पैसे मागण्यास परत आला तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.

डाॅ. आशीष अरुणराव दिवेकर (३७, रा. हिल व्ह्यू सोसायटी, गणेश मंदिर जवळ, पायलीपाडा, ट्राॅम्बे, मुंबई) असे तक्रारदार डाॅक्टरचे नाव आहे. डाॅ. दिवेकर यांनी स्वस्थम आयुर्वेदचे मालक डाॅ. सुनीलकुमार महेंद्रप्रताप सिंग, मुख्य वित्तीय सल्लागार अनिल महेंद्रप्रताप सिंग, संचालक शांती महेंद्रप्रताप सिंग, लेखापाल महेंद्रप्रताप सिंग, व्यवसाय विकास प्रमुख भानुशाली, परिचालन प्रमुख दीप भानुशाली (रा. सदनिका क्र. ११०४, ११ वा माळा, एमरील्स आईस टाॅवर, एल ॲन्ड टी, साकीविहार रस्ता, पवई, मुंबई) यांच्या विरुध्द तक्रार केली आहे. स्वस्थम आयुर्वेदचे कार्यालय शाॅप क्र. दोन ते सात, एम. जी. प्लाझा, कल्याण शिळफाटा रस्ता, सोनारपाडा, डोंबिवली पूर्व येथे आहे. ६ जुलै २०२० पासून ते गुन्हा दाखल करेपर्यंतच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. मानपाडा पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : मुंब्रा, कल्याण आणि भिवंडी भागातून पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी घेतले ताब्यात

स्वस्थम आयुर्वेद मधील आरोपी मालक डाॅ. सुनीलकुमार सिंग आणि इतरांनी फिर्यादी डाॅ. आशीष दिवेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांना स्वस्थम आयुर्वेद कंपनीचा विस्तार करायचा आहे. यासाठी आपण गुंतवणूक केली तर त्या बदल्यात आपणास मोठा आकर्षक परतावा मिळेल. जशी गुंतवणूक वाढत जाईल त्याप्रमाणे आपणास अधिकचा परतावा मिळेल. असे सांगून स्वस्थमच्या संचालकांनी डाॅ. आशीष यांचा विश्वास संपादन केला. डाॅ. आशीष यांनी संचालकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आपल्या गुंतवणुकीवर वार्षिक ४८ टक्के परतावा मिळणार असल्याने डाॅ. आशीष यांनी स्वस्थम आयुर्वेदच्या संचालकां बरोबर गुंतवणुकीचा करारनामा केला. डाॅ. आशीष यांनी आपल्या बँक खाते असलेल्या ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय, एचडीएफसी बँक खात्यांमधून विविध टप्प्यात एकूण ५० लाख ५० हजार रुपये स्वस्थमचे मालक डाॅ. सुनीलकुमार यांच्या खात्यावर वळते केले. आणि ३५ लाख रुपयांची रोख रक्कम असे एकूण ८५ लाख ५० हजार रुपये दोन वर्षापूर्वी डाॅ. आशीष यांनी स्वस्थम आयुर्वेद मध्ये गुंतवणूक केले.

हेही वाचा : मातृत्वाचा सन्मान हाच आमचा अभिमान ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

या व्यवहाराच्या बदल्यात स्वस्थम आयुर्वेदच्या पैसे जमा केल्याच्या पावता डाॅ. आशीष यांना देण्यात आल्या. सुरुवातीला डाॅ. आशीष यांना गुंतवणुकीवरील ४८ टक्के मोबदला देण्यात आला. गुंतवणुकीवर मोबदला मिळतो म्हणून आशीष यांना आणखी गुंतवणूक करण्यास संचालक भाग पाडू लागले. एक रकमी आकर्षक परतावा मिळत असल्याने संचालक आपली फसवणूक करीतल असे डाॅ. आशीष यांच्या लक्षात आले नाही. नेहमीप्रमाणे वेळेत मिळणारा परतावा जुलै २०२२ पासून डाॅ. आशीष दिवेकर यांना मिळण्यास उशीर होऊ लागला. त्यांनी संचालकांना परतावा देण्यासाठी तगादा लावला. सुरुवातीला त्यांनी आर्थिक बेताची परिस्थिती अशी कारणे दिली. नंतर ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. भेट टाळू लागले.

हेही वाचा : पक्षप्रमुख उध्दव ठाकरे समर्थक कल्याणचे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना तडीपाराची नोटीस

डाॅ. आशीष यांना आपली फसवणूक होत आहे असे लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या मूळ रकमेसह त्यावरील परतावा देण्याची मागणी सुरू केली. त्यावेळी आरोपी संचालकांनी डाॅ. आशीष यांना ‘तू जर पुन्हा पैसे मागण्यासाठी आमच्या घऱी कार्यालयात आला तर तुला जीवे ठार मारू’ अशी धमकी दिली.आपल्या गुंतवणुक रकमेचा आरोपींनी अपहार करुन आपली फसवणूक केली म्हणून डाॅ. आशीष दिवेकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस निरीक्षक एस. डी. डांबरे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-09-2022 at 12:09 IST

संबंधित बातम्या