कल्याण – दुपारची वेळ आहे. मुलांनो झोपाळ्यावर खेळू नका. झोपाळ्याचा खूप आवाज येतो, असे सोसायटीतील मुलांना एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले. एका मुलाच्या आई, वडिलांना या गोष्टीचा राग आला. त्यांनी आमच्या मुलाला असे सांगणारे तुम्ही कोण, असे प्रश्न करून या ज्येष्ठ नागरिकासह त्याच्या पत्नी आणि मुलाला शुक्रवारी दुपारी सोसायटीच्या आवारात बेदम मारहाण केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण पश्चिमेतील गांधारी गाव येथील लोढा हेवनमधील जुई सोसायटीत हा प्रकार घडला आहे. मदनसिंंग गोविंदसिंग बिस्ट (६२), त्यांची पत्नी आरती, मुलगा आशीष (२७), हर्षिता (२४) जुई सोसायटीत राहतात. बिस्ट कुटुंबियांना लक्ष्मण तेजा नाईक आणि त्यांची पत्नी आशा यांनी बेदम मारहाण केली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मदनसिंग हे मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

हेही वाचा – वंचितच्या भूमिकेने औरंगाबादमध्ये ठाकरे गटात चलबिचल

पोलिसांंनी सांगितले, जुई सोसायटीच्या आवारात शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान सोसायटीतील मुले उद्यानातील झोक्यावर खेळत होती. झोका जुना झाल्याने त्याच्या बिजागरांचा मोठ्याने आवाज येतो. दुपारच्या वेळेत बिस्ट कुटुंबीय झोपले होते. परंतु, झोक्याच्या कर्णकर्कश आवाज आणि मुलांच्या ओरड्याने शांततेचा भंग होत होता. त्यामुळे मदनसिंग यांनी झोक्यावर खेळत असलेल्या मुलांना घरी जा असे सांगितले. बहुतांशी मुले निघून गेली परंतु, आरोपी लक्ष्मण नाईक यांचा मुलगा शिवा हा तेथेच खेळत राहिला. मदनसिंग यांनी त्याला घरी जाण्यास सांगितले. परंतु तो ऐकत नव्हता. ही माहिती शिवाचे वडील लक्ष्मण, आई आशा यांना समजताच ते सोसायटी आवारात येऊन मोठ्याने ओरडून बिस्ट कुटुंबियांना शिवीगाळ करू लागले.

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

हेही वाचा – सुनील तटकरेंचाही कडेलोट करावा लागेल… शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे धक्कादायक वक्तव्य

बिस्ट यांचा मुलगा सोसायटीच्या आवारात फेरफटका मारत होता. त्याला आरोपी लक्ष्मण आणि त्यांच्या पत्नीने बेदम मारहाण सुरू केली. मुलाला सोडविण्यासाठी मदनसिंग बिस्ट कुटुंबिय इमारतीच्या तळमजल्याला आले. मुलाला आरोपींच्या तावडीतून सोडवित असताना लक्ष्मण, आशा यांनी ज्येष्ठ नागरिक असूनही मदनसिंग यांना खाली पाडून त्यांच्यावर विटांचा मारा करून त्यांना जखमी केले. मदनसिंग यांच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली. सोसायटीच्या इतर रहिवाशांनी मध्यस्थी करून हा वाद सोडविला. मदनसिंग यांना पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. किरकोळ कारणावरून नाईक कुटुंबियांना मारहाण केल्योने मदनसिंग बिस्ट यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A senior citizen and his family were brutally beaten at gandhari in kalyan ssb