अलिबाग – महायुतीच्या सूत्राचे खासदार सुनील तटकरे यांनीही पालन करायला हवे. राजकारणातील परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे तटकरे यांनी वेगळी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचाही कडेलोट करावा लागेल, असे धक्कादायक विधान आमदार महेंद्र थोरवे यांनी नुकत्याच झालेल्या शिवसेना रायगड जिल्हा शिवसेना कार्यकारणीच्या बैठकीत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा कार्यकरिणीची बैठक पेण येथे पार पडली. आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीला आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाप्रमुख राजा केणी, दक्षिण रायगडचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या बैठकीत महायुतीतील विसंवाद आणि धुसफुस प्रकर्षाने समोर आली. शिवसेना शिंदे गटाकडून महायुतीतील घटक पक्षांबाबत सामंजस्याची भूमिका घेतली जात असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून तशी सामंजस्याची भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे युतीचा धर्म इतर पक्ष पाळत नसतील तर आपल्यालाही वेगळा विचार करावा लागेल, अशी भूमिका यावेळी बहुतेक पदाधिकाऱ्यांनी मांडली.

कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने शिवसेना विरोधात कुरघोड्या करण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. शिवसेनेचे पदाधिकारी फोडून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले जात आहे. याबाबत आमदार थोरवे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. खासदार सुनील तटकरे यांना बदलावे लागेल. युतीच्या सूत्राचे पालन करावे लागेल. युतीच्या सूत्राचे सुनील तटकरे तंतोतंत पलन करणार नसतील तर त्यांचाही कडेलोट करावा लागेल, असे उद्गार आमदार थोरवे यांनी यावेळी काढले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सुप्त संघर्ष समोर आला.

हेही वाचा – मीरा भाईंदरमधील भाजप-शिवसेना वाद शिगेला

याच बैठकीत जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी भाजपच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. भाजपकडून लोकसभेसाठी महायुतीचा धर्म पाळण्याचे आवाहन केले जाते. पण त्याचवेळी विधानसभा मतदारसंघात युतीच्या घटक पक्षांविरोधात भूमिका घेतली जाते. आपल्याकडून जर युतीचा धर्म पाळण्याचे प्रामाणिक प्रयत्न होत असतील तर दुसरीकडे भाजपकडूनही युतीचा धर्म पाळण्याबाबत तसे प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. रायगड लोकसभा मतदारसंघ असो अथवा मावळ लोकसभा मतदारसंघ असो, तसे चित्र दिसत नाही. तीन पक्षांतील समन्वय वाढावा यासाठी अलिबागमध्ये महायुतीची बैठक बोलवण्यात आली होती. पण भाजपच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या बैठकीस येण्यास नकार दिला. वरिष्ठ पातळीवर याची दखल घेतली पाहिजे, असे मतही राजा केणी यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा – मुलाच्या ‘कल्याणा’साठी मुख्यमंत्र्यांचे सारे काही

एकूणच या बैठकीत महायुतीमधील सुप्त संघर्ष प्रकर्षाने समोर आला. मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात, तर रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप विरोधात असलेली नाराजी पदाधिकाऱ्यांनी जाहीररित्या बोलून दाखवली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group mla mahendra thorve shocking statement about sunil tatkare print politics news ssb
First published on: 24-03-2024 at 11:55 IST