जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर प्रकार

ठाणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षा रद्द केल्याने गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर सोमवारी अभाविपचे कार्यकर्ते निदर्शने करण्यासाठी आले होते. त्या वेळेस अभाविप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी होऊन दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

 पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर वातावरण काहीसे शांत झाले. आव्हाड यांच्या निवासस्थानाच्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सोमवारी आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यासाठी आले होते.  राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही त्या ठिकाणी जमले होते. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आव्हाड यांच्या निवासस्थानी जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी विवियाना मॉलच्या परिसरातच कार्यकर्त्यांना रोखून धरले.

आरोप-प्रत्यारोप

पेपरफुटी, परीक्षा रद्द आणि विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकारची ओळख झाली आहे असा आरोप अभाविपने करत आंदोलन केले. या वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करून हल्ला केला. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेऊन अभाविप कार्यकर्त्यांवर लाठीमार केला, असा आरोप परिषदेचे कोकण प्रांत कार्यालयमंत्री शंकर संकपाळ यांनी केला आहे.

ज्या मंत्र्याने तीन दिवस मेहनत घेऊन सगळ्या बातम्या गोपनीय ठेवत आरोपींना पकडून दिले. राज्यातील पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. पेपर फुटायच्या आधी सतर्कता बाळगत परीक्षा रद्द केली. कुणालाही काहीच करण्याची संधी दिली नाही. परीक्षेत किंवा पेपर फोडण्यासाठी पैशाचा वापर होणार नाही, याची दक्षता घेतली, त्या मंत्र्याच्या घरावर मोर्चा कशासाठी, असा प्रश्न  आव्हाड यांनी केला आहे.