राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेच्या दोन पदाधिकाऱ्यांची ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. वाघवसे यांनी सबळ पुराव्याअभावी निदरेष मुक्तता केली. जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार एका पालकाने केल्याने या दोघांवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन वर्षांपासून या प्रकरणाचा दावा ठाणे न्यायालयात सुरू होता.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष शशिकांत कर्डेकर, कार्यवाह संजय कुलकर्णी ही  या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. संस्था अध्यक्ष असताना कर्डेकर, कुलकर्णी यांच्यावर दोन वर्षांपूर्वी जातिवाचक शिवीगाळीची तक्रार दाखल करण्यात आली होती, असे संस्था पदाधिकाऱ्यांचे वकील अ‍ॅड. एस. एस. बुटाला यांनी सांगितले. शाळेतील पालक रमेश पौळकर यांची मुले स्वामी विवेकानंद शाळेत शिक्षण घेत होती. मागासवर्गीय असूनही आपल्या मुलांकडून शाळा शुल्क कसे आकारते, अशी माहिती पौळकर यांनी संस्थेकडे मागितली होती. योग्य शुल्क भरून माहिती देण्यात येईल, असे पालक पौळकर यांना कळवण्यात आले होते. हे प्रकरण ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे गेले होते. तेथील सुनावणीसाठी शशिकांत कर्डेकर, संजय कुलकर्णी आणि रमेश पौळकर गेले होते. सुनावणी झाल्यानंतर बाहेर पडताना कर्डेकर, कुलकर्णी
यांनी आपल्या अंगावर त्यांचे वाहन आणले, तसेच आपणास मारण्याचा प्रयत्न झाला, तसेच जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार पौळकर यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात केली होती. गेली दोन वर्षे या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रकरणात पुरावा आढळून आल्याने या दोघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.