ठाणे महापालिका क्षेत्रात भूमाफियांकडून बेकायदा बांधकामे उभारणीची कामे सुरु असून अशा बांधकामांवर हातोडा मारण्याची मोहिम पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. या मोहिमेत माजिवाडा-मानपाडा भागातील तीन बेकायदा बांधकामे तोडण्यात आली आहेत. अशी कारवाई यापुढेही सुरुच राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात भुमाफियांकडून मोकळ्या जागांवर अतिक्रमण करून बेकायदा बांधकामे उभारली जात आहेत. करोना काळात शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहीली असून त्याविरोधात महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांनी मोहिम हाती घेऊन बांधकामे जमीनदोस्त केली होती. ही कारवाई थंडावताच गेल्या काही महिन्यांपासून भुमाफिया पुन्हा सक्रीय झाले असून त्यांनी बेकायदा बांधकामे उभारणीची कामे सुरु केली आहेत. यावरून पालिका प्रशासनावर टिका होऊ लागताच आयुक्त शर्मा यांनी बेकायदा बांधकामांविरोधात विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यात पालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून बेकायदा बांधकामे तोडण्यात येत आहेत. मंगळवारी माजीवाडा-मानपाडा भागात पालिकेच्या पथकाने तीन ठिकाणी कारवाई केली. यामध्ये सुरज वॉटर पार्कलगतच्या सेवा रस्त्यावर अचल वाहनांवर होडिंगसाठी उभारण्यात आलेले अनधिकृत लोखंडी साचा गॅस कटरच्या सहाय्याने तोडून टाकण्यात आला. 

ब्रम्हांड येथे अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले शौचालयाचे बांधकाम तोडण्यात आले. तसेच मनोरमानगर येथे नमिता पांडे यांचे २ वाणिज्य अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आली. हि कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, परिमंडळ ३ चे उपायुक्त दिनेश तायडे, साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त प्रितम पाटील यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्या साहाय्याने पोलीस बंदोबस्तात केली. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.