करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे शहरातील सर्व दुकाने, हॉटेल्स, आस्थापना, शेअर प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याबरोबरच शहरातील गर्दी टाळण्यासाठी रस्त्यावर, चौकांमध्ये कोणत्याही निमित्ताने दहापेक्षा अधिक लोक एकत्र आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना दिले.

रविवारी जनता संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे परिवहन सेवेची ४० टक्केबससेवा सुरू ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. दरम्यान, जनता संचारबंदीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त सिंघल यांनी केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील किराणा दुकाने, दूध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू आणि औषधालय वगळून अन्य सर्व दुकाने, आस्थापना, हॉटेल्स, बीअरबार, वाइन शॉप येत्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त सिंघल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. सर्व खाजगी कंपन्या, खाजगी आस्थापना, सल्लागार संस्था, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्थापना, सर्व उद्योग, व्यवसाय, व्यापारही ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असून त्यांनी घरातूनच काम करावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. या आदेशातून अत्यावश्यक सेवा, आवश्यक उत्पादने करणाऱ्या कंपन्या, आस्थापनांना वगळण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल. ठाणे महापालिकेचे सर्व उपआयुक्त, परिमंडळे, संबंधित साहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत पोलीस निरीक्षकांच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात येणार आहे.

देशात संचारबंदी लागू झाल्याने ठाणे महापालिकेची सर्व कर संकलन केंद्रे बंद ठेवण्यात येणार असून या दिवशी ऑनलाइन कर संकलन स्वीकारले जाणार आहेत.