उदय सबनीस, अभिनेते
विद्यार्थिदशेत असतानाच मला वाचनाची आवड निर्माण झाली. १९७५ च्या दरम्यान मी डोंबिवलीमध्ये राहायला होतो. माझ्या शेजारी त्या वेळी प्रवीण दवणे राहायला होते. एकदा त्यांनी मला ‘ययाति’ पुस्तक वाचायला दिले. ‘ययाति’ हे मी वाचलेले पहिले पुस्तक. त्या पुस्तकापासून माझ्या वाचनाचा प्रारंभ झाला. कोणत्याही प्रकारचे साहित्य वाचायला मला आवडत असले तरी आत्मचरित्र आणि चरित्र या साहित्य प्रकारात मी जास्त रमतो. पूर्वीपासूनच या साहित्य प्रकारांची मला आवड असल्याने लहानपणीच मी टॉलस्टॉय यांची पुस्तके वाचली. डॉ. अल्बर्ट श्वाईकझर यांच्या चरित्राचा माझ्यावर फार प्रभाव आहे. आपल्या देशात बाबा आमटे यांनी जसे कार्य केले आहे, तशाच प्रकारचे समाजकार्य डॉ. अल्बर्ट श्वाईकझर यांनी आफ्रिकेत केलेले आहे. हेन्री शारियर यांचे ‘पॅपिलॉन’ पुस्तक आवडते. चार्ली चॅप्लिनचे आत्मचरित्र मी पुन:पुन्हा वाचतो. त्याच्यासारखे विविधरंगी आयुष्य असूच शकत नाही असे मला वाटते. एक प्रत वाचून संपली की, पुन्हा दुसरी प्रत आणतो. १९८० पासून हे माझे सातत्याने सुरू आहे. एवढा मी त्या पुस्तकाचा दीवाना आहे.
ली आयकोका यांचे चरित्र अत्यंत प्रभावी आहे. फोर्ड या नामांकित कार कंपनीमधून कामावरून काढून टाकल्यावर या व्यक्तीने स्वत:च्या मेहनतीने कार क्षेत्रातील नवीन ब्रँड तयार केला. फोर्ड कारच्या बरोबरीने ली आयकोका यांनी तयार केलेली कार रस्त्यावर धावू लागली. त्यांचा प्रवास वाचण्यासारखा आहे. नाटक या साहित्य प्रकारात प्रभाकर पणशीकरांचे ‘तो मीच’ वाचायला आवडले. खेळ विषयातील सुनील गावस्कर यांचे ‘सनी डेज’ वाचले. कथा प्रकारात अरविंद गोखले, जी.ए. कुलकर्णी, रत्नाकर मतकरी, ग.दि.माडगूळकर यांच्या कथा वाचायला मला आवडतात. श्री.ना. पेंडसे यांची ‘लव्हाळी’ कादंबरी वाचलेली आहे. सध्या मी ‘मेलूहा’ कादंबरी वाचत आहे. प्रकाश संत यांची ‘लंपन’ कादंबरी वाचली. संदीप आसलेकरांचे ‘एका दिशेचा शोध’ हे पुस्तक वाचत आहे.
tv10जे पुस्तक वाचताना कंटाळा येतो ते पुस्तक मी वाचत नाही. कोणतेही पुस्तक एकदा वाचून माझे समाधान होत नाही. ऋजुता दिवेकरांचे ‘डोन्ट लूज युवर माइंड लूज युवर वेट’ हे पुस्तक आवडले. पाककलेविषयी असलेली पुस्तके वाचायला मला आवडतात. अशी पुस्तके मी कुतूहलाने वाचतो. या संदर्भात सुजाता चंपानेरकरांचे ‘सूप’ हे पुस्तक वाचले. ‘मृत्युंजय’, ‘श्रीमानयोगी’ वाचलेले आहे. मात्र ऐतिहासिक, पौराणिक साहित्य प्रकारांत मी रमत नाही. मुळात मला माणूस शोधायला आवडतो. किरण बेदी यांचे ‘आय डेअर’, सचिन पिळगावकरांचे ‘हाच माझा मार्ग’ अशी आत्मचरित्रे वाचायला आवडतात. त्यामुळे चरित्रातून मी माणूस शोधतो. पु.ल. देशपांडेचे साहित्य वाचले. त्यांच्या ध्वनिफिती ऐकल्या आहेत. पुलंची पात्रे काल्पनिक असली तरी मला वाचताना ती जिवंत वाटतात. विकसित मनात पात्रे विकसित होतात, याचा अभिनयासाठी खूप उपयोग होतो. नाटय़लेखकांविषयी सांगायचे झाले तर वसंत कानेटकरांची नाटके आवडतात. सध्या डॉ. विवेक बेल्हे हे लेखक आवडतात. ‘माकडाच्या हाती श्ॉम्पेन’, ‘अलीबाबा आणि चाळिशीतील चोर’ अशा वेगळ्या विषयांवरील लिखाण मला भावले. कविता प्रकारात मंगेश पाडगावकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, संदीप खरे या कवींच्या कविता आवडतात. ‘साधना’ साप्ताहिक मी नियमितपणे वाचतो. जे.आर.डी. टाटा यांचे ‘की नोट’, शांता गोखले यांचे ‘रिटा वेलिडकर’ पुस्तक आवडले. अशोक जैन यांचा अनुवाद असलेले इंदिरा गांधींचे चरित्र वाचायला आवडले.
वाचनाने खऱ्या अर्थाने मला समृद्ध केले असे मला वाटते. जीवनाचे ज्ञान वाचनातून कळते. कल्पनाशक्ती बहरते. जगात इतरही कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आहेत हे वाचनाने उमजते. शंकर पाटील यांच्या साहित्याने गावरान भाषा कशी बोलायची हे कळते, तर पु.ल. देशपांडे यांच्या साहित्यातून पारसी, कर्नाटकी व्यक्ती मराठी भाषा कशी बोलेल हे समजते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे वाचन सतत व्हायला हवे असे वाटते. तरुणांचा वाचनाकडे कल कमी आहे असे मला वाटत नाही, फक्त त्यांची माध्यमे बदलली आहेत. काय वाचन करायला हवे याची योग्य दिशा त्यांना मिळायला हवी.
शब्दांकन – किन्नरी जाधव