ठाणे : रमजान ईदनिमित्ताने भिवंडी आणि मुंब्रा शहरात एक हजारहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून मशिदींवरील भोंगे उतरले नाही तर, ४ मे पासून मशिदींसमोर ध्वनिक्षेपकावर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी शहरातील मौलवी, मशिदींचे विश्वस्त, शांतता समितीचे सदस्य यांची बैठक घेण्यास सुरुवात केली आहे.
मौलवींनी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे आम्ही पालन करून भोंग्याचा आवाज मर्यादित ठेवू असे सांगितले, तर पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील भिवंडी आणि मुंब्रा शहरात मोठय़ा प्रमाणात मुस्लीम बांधव वास्तव्यास आहेत. भिवंडीमध्ये १८१ मशिदी आहेत, तर मुंब्रा शहरात १११ मशिदी आहेत. रमजान ईदच्या दिवशी हजारो मुस्लीम बांधव या मशिदींसमोर जमत असतात. मंगळवारी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून भिवंडी शहरात सुमारे १,१०० तर, मुंब्रा शहरात १०० हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. यामध्ये शीघ्र कृती दल, राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा यांचा यामध्ये समावेश असणार आहे. मंगळवारी पहाटेपासूनच या शहरांत फौजफाटा तैनात केला जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये मशिदींवरील भोंगे मंगळवापर्यंत उतरले नाहीतर या मशिदींसमोर ध्वनिक्षेपक लावून त्यावर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. ठाणे पोलिसांनी भिवंडी आणि मुंब्रा शहरात शांतता समितीची बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले जात आहे.
पोलिसांनी मौलवी, मशिदींचे विश्वस्त बैठक घेऊन त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार भिवंडीतील काही मशिदींनी आवाजाच्या नियमांचे पालन करण्यास सुरुवात केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुन्ह्यांची माहिती मिळविणे सुरू
राज्यातील मशिदींवरील भोंगे मंगळवारी उतरविले गेले नाही तर ४ मे पासून मशिदींसमोर ध्वनिक्षेपक वाजविण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मिळविण्यास सुरुवात केली आहे.
भिवंडीमध्ये सर्वधर्मीय बांधव सलोख्याने राहात आहेत. रमजान ईदनिमित्ताने पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही सर्व पोलीस अधिकारी शांतता समितीचे सदस्य, मशिदींचे विश्वस्त, मौलवींच्या बैठका घेत आहोत. त्यांच्याकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. – योगेश चव्हाण, उपायुक्त, भिवंडी परिमंडळ