– अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, अध्यक्ष, कल्याण जनता सहकारी बँक
कल्याण हे मध्य रेल्वे मार्गावरील महत्वाचे जंक्शन आहे. रेल्वे गाडय़ांच्या उपलब्धतेमुळे नोकरदार वर्गाच्या दृष्टीने महत्वाचे गाव म्हणजे कल्याण. माझ्या लहानपणी साठच्या दशकात कल्याण म्हणजे एक टुमदार गाव होते. दुधनाक्या पासून ते शिवाजी चौकाचा परिसर, जुनी बाजारपेठ, आग्रा रोड, रामबाग, मुरबाड रोड चतु:सीमेपुरते हे गाव मर्यादित होते. घर मालकांचे जुने वाडे आणि या वाडय़ांमधून गुण्यागोविंदाने राहणारे घर मालक आणि भाडेकरू हे जुन्या कल्याणचे वैशिष्ट होते. कल्याण पूर्व भाग हा विशेष विकसित झाला नव्हता. रेल्वे स्थानक ते दूधनाका, टिळक चौक परिसरात सार्वजनिक वाहतुकीसाठी टांगे हे महत्वाचे वाहन होते. चारचाकी, दुचाकी यांचे प्रमाण अतिशय कमी होते. ऐतिहासिक शहर म्हणून हे गाव ओळखले जाते. या शहराला शिवकालीन तसेच पेशवेकालीन इतिहासाचा वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमाराची स्थापना कल्याणच्या खाडीमधून केल्याची नोंद आहे. जुन्या काळातील देवळे, पोखरणी, तलाव, मशिदी, जुनी घरे या सर्वांमधून समृध्द परंपरेचे दर्शन होते.
ऐतिहासिक महत्व जपत असतानाच कल्याण शहराला सामाजिक व सांस्कृतिक जीवन लाभले आहे. शहरातल्या विविध क्षेत्रांमधल्या संस्था सक्षमपणे कार्यरत आहेत. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने १८९५ साली कल्याणमधला सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ झाला. शिवाजी चौक परिसरात १५० वर्षांहून अधिक काळाची परंपरा असलेले सार्वजनिक वाचनालय आहे. महिला मंडळ, महिला उत्कर्ष मंडळ, महिला सहकारी उद्योग मंदिर, उज्जवला मंडळ या सारख्या महिलांनी महिलांकरिता चालविलेल्या संस्था येथे आहेत. श्री. संत राममारूती महाराज, अप्पा मास्तर लेले या सारखे संत या भूमीत होऊन गेले. कल्याण हे पूर्वी पासून व्यापारपेठ म्हणून देखील ओळखले जाते. अशी समृध्द आणि गौरवशाली परंपरा लाभलेल्या कल्याण शहराच्या लोकसंख्येत गेल्या सुमारे २५ वर्षांत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. कल्याणच्या खडकपाडा, आधारवाडी परिसरात मोठी गृहसंकुले उभी राहिली. आता नवीन कल्याण म्हणून हा भाग ओळखला जात आहे. जुन्या शहरापेक्षा वेगळी संस्कृती खडकपाडा भागात विकसित झाली आहे. मागणी तसा पुरवठा या न्यायाने विकास झाला पण तो नियोजन बध्द रितीने झाला नाही. उपलब्ध होऊ शकणाऱ्या सुविधांचा विचार न करता झालेल्या या बांधकामांमुळे ज्या प्रमाणात लोकसंख्येत झालेली वाढ त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध न झाल्याची आणि होत नसल्याची खंत मनात वाटते.
हीच परिस्थिती कल्याण पूर्व भागाच्या बाबतीत आहे. रस्ते, दररोजची वाहतूक कोंडी, वाहनांचे कर्णकर्कश आवाज, कचऱ्याचे साम्राज्य, आधारवाडी क्षेपणभुमीकडील दुर्गंधी, प्रदूषण, फेरीवाल्यांचा उपद्रव, वाढती गुन्हेगारी, रिक्षा चालकांची मनमानी, बकाल झालेला रेल्वे स्थानक परिसर, वाढती बेकायदा बांधकामे, टपऱ्या, फेरीवाल्यांनी अडवलेले पदपथ, वर्दळीच्या आणि महत्वाच्या चौकांमध्ये नसलेले वाहतूक दर्शक अशा एक नाही शेकडो समस्यांनी कल्याण शहराला आता वेढले आहे. कल्याणच्या खाडीवरील गणेशघाट परिसर नागरिकांना मोकळ्या हवेसाठी तसेच विरंगुळ्यासाठी चांगले ठिकाण आहे. पण या भागात घाणीचे, फेरीवाल्यांचे वर्चस्व. त्यात क्षेपणभुमीवरून येणारी दुर्गंधी नकोसी वाटते. मोकळा श्वास घेता येईल अशी कल्याण शहराची परिस्थिती राहिली नाही. नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी नियोजनबध्द ठोस कार्यक्रम पालिका प्रशासनाने राबविणे आवश्यक आहे. हाताबाहेर गेलेल्या या समस्यांमुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचा टुमदारपणा केव्हाच हरवून गेला आहे. शहरातले संस्थात्मक सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन जगत असतानाच, येथील नागरिकांना भेडसावत असणाऱ्या समस्यांची सोडवणूक व्हावी आणि त्यांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे. हे पुरे करू शकणारा भारतीय प्रशासकीय सेवेतील खमक्या आयुक्त कल्याण डोंबिवली पालिकेला मिळाला आहे. मात्र, त्याबरोबर सत्ताधारी राज्यकर्त्यांची साथ मिळाली तरच कल्याण टुमदार शहर होऊ शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adv suresh patwardhan view about kalyan city
First published on: 09-09-2015 at 00:01 IST