डोंबिवली : कल्याण लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्या वैशाली दरेकर-राणे यांनी मंगळवारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे दाखल केला.

यावेळी युवा नेते आदित्य ठाकरे, आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड, माजी आमदार सुभाष भोईर, संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, काँग्रेसचे नेते संतोष केणे, प्रवक्ते महेश तपासे, उपजिल्हा संघटक हर्षवर्धन पालांडे, युवा नेते वरूण सरदेसाई, जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, राष्ट्रवादीचे वंडार पाटील उपस्थित होते. रखरखीत उन असूनही कार्यकर्ते हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन घामाघून होऊनही या फेरीत सहभागी झाले होते.

हेही वाचा……अन्यथा हे मंत्रालय सुरतला नेतील, युवा नेते आदित्य ठाकरे यांची डोंबिवलीत भाजप-शिवसेनेवर टीका

उमेदवार वैशाली दरेकर यांनी मंगळवारी सकाळी डोंबिवलीचे ग्रामदैवत फडके रस्त्यावरील श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्या इंदिरा चौकात उमेदवारी अर्ज भरण्याच्या फेरीत दाखल झाल्या. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत वैशाली दरेकर यांच्या विजयाच्या घोषणा देत होते. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांचा जयघोष केला जातो. राष्ट्रवादी, काँग्रेस कार्यकर्ते आपल्या नेत्यांचा जयघोष करत होते. त्यामुळे वातावरण घोषणांनी दुमदुमून गेले होते.

ढोलताशांच्या दणदणाटाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मध्यवर्ती शिवसेना शाखेजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला युवा नेते आदित्य ठाकरे यांनी हार अर्पण केला. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या फेरीला सुरूवात झाली. एका सजविलेल्या वाहनावर उमेदवार वैशाली दरेकर, युवा नेते आदित्य ठाकरे, डॉ. जितेंद्र आव्हाड, महेश तपासे, वरूण सरदेसाई, सदानंद थरवळ विराजमान झाले होते. नागरिकांना अभिवादन करत वाजतगाजत फेरी घरडा सर्कल येथील निवडणूक कार्यालयाकडे निघाली होती.

हेही वाचा…डोंबिवलीतील सोनारपाडा येथील महारेरा गुन्ह्यातील इमारत जमीनदोस्त; सोनारपाड्यात महारेरा गुन्ह्यातील आणखी पाच इमारती सज्ज

यावेळी रस्तोरस्ती वाहनकोंडीचे दृश्य होते. अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण पूर्व, कळवा-मुंब्रा भागातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते फेरीत सहभागी झाले होते.

हेही वाचा…कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद

प्रचाराच्या रणधुमाळीत जनता आपल्या पाठीशी आहे हे ठामपणे दिसले. विकासाच्या नावाने बोंबा ठोकल्या जात असल्या तरी विकास कोणाचा झालाय हेही लोकांना माहिती आहे. त्यामुळे या भागातील सर्व जनता उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आहे हे आजच्या गर्दीतून, प्रचारातून दिसून आले आहे.– वैशाली दरेकर उमेदवार, महाविकास आघाडी