ठेकेदारांपुढे महापालिका हतबल
भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या जाहिरात विभागाची थकबाकी ४१ कोटींहून अधिक असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिकेला अपेक्षित उत्पन्नाच्या १० टक्के देखील उत्पन्न मिळत नसल्यामुळे महापालिकेला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. जाहिरात ठेकादारांकडून वसुली करण्यात महापालिका हतबल झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
महानगरपालिका क्षेत्रात मुख्य मार्गांवर तसेच महत्वाच्या ठिकाणी शहराचे सौंदर्य वाढवून जाहिरातीद्वारे उत्पन्न वाढवण्याकरिता प्रशासनाकडून जाहिरात क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. याकरिता प्रशासनाने स्वतंत्र जाहिरात विभागची रचना केली आहे. प्रतिवर्षी अर्थसंकल्पात या विषयी तरतूददेखील करण्यात येते. तसेच या जाहिरातीद्वारे उत्पन्न प्राप्त करण्याकरिता ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ठेकदार पालिका प्रशासनाला उत्पन्नच देत नसल्याचे उघडकीस आले आहे.त्यामुळे या विभागाची थकबाकी ४१ कोटी ५० लाख ६५ हजार ९७६ इतकी झाली आहे.
जाहिरात आणि होर्डिग्ज अशी एकूण ४१ कोटी ५० लाख ६५ हजार ९७६ इतकी थकबाकी पालिकेची बाकी असताना अर्थसंकल्पात केवळ दिखाव्यावपुरते उत्पन्न दाखवून मोठी लूट सुरू असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे, तर नुकतीच या संदर्भात पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी बैठक घेतली असून वसुली वाढवण्याकरीता भर देणार असल्याचे पत्रक सामान्य प्रशासन विभाग अधिकारी राजकुमार घरत यांनी दिले.
अपेक्षित चार कोटींपैकी केवळ ७४ हजारांची वसुली
या वर्षी जाहिरात शुल्कद्वारे प्रशासनाला एकूण ४ कोटी २२ लाख ३५ हजार ३३६ रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र यात केवळ ७४ लाख ३० हजार ३८२ रुपयांची वसुली झाली असून ३ कोटी ४८ लाख ४ हजार ९५४ रुपयांची थकबाकी आहे. त्याचप्रमाणे होर्डिग्जद्वारे एकूण ३८कोटी ५९ लाख १३ हजार ७३६ रुपये उत्त्पन्न अपेक्षित होते.मात्र यात केवळ ५६ लाख ५२ हजार ७१४ रुपयांची वसुली झाली असून ३८ कोटी २ लाख ६१ हजार २२ रुपयांची थकबाकी राहिली आहे.
