ठाण्यातील श्रीनगर भागातील एअर इंडियाच्या कॉल सेंटरमध्ये आयएसआय अतिरेकी संघटनेच्या नावाने दूरध्वनी आल्याने शुक्रवारी एकच खळबळ उडाली. २८ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करण्यात येणार असल्याची धमकी दूरध्वनीवर देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा माग काढण्यास सुरुवात केली असून मध्य प्रदेशातून हा दूरध्वनी आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
ठाणे येथील श्रीनगर भागात एअर इंडियाचे कॉल सेंटर असून तेथील टोल फ्री क्रमांकावर देश-विदेशातून दूरध्वनी येतात. शुक्रवारी रात्री उशिरा कॉल सेंटरमध्ये एक निनावी दूरध्वनी आला. आयएसआय अतिरेकी संघटनेतून बोलत असल्याचे सांगून त्याने एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करणार असल्याची धमकी दिली. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.