अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वसतिगृहात येत्या महिन्याभरात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून ३०० विद्यार्थ्यांची सोय असलेल्या या वसतिगृहाचा ताबा विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. येथील शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी हा प्रश्न विधानपरिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला असता त्यांच्या प्रश्नावर असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण तसेच गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले.
अंबरनाथमधील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात गेल्या काही दिवसांपासून अनेक सुविधांची वानवा आहे. येथे शिकण्यास दर वर्षी अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र, येथे त्यांना मिळणाऱ्या सुविधांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तसेच येथे ३०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे वसतिगृह बांधण्यात आले होते. परंतु, त्यात अजूनही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला नव्हता. त्याचबरोबर येथील स्वयंपाकघर नसल्याचा मुद्दादेखील चर्चेत होता. अखेर विधान परिषद सदस्य रामनाथ मोते यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वसतिगृह तसेच येथील अन्य गैरसोयींबाबत प्रश्न उपस्थित केले होते. यावर उत्तर देताना वायकर म्हणाले की, येथील वसतिगृहाला एक महिन्याच्या आत ताबा प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच महिन्याभरात विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. वसतिगृहाला आवश्यक कर्मचारीवर्गही देण्यात येणार असून वसतिगृहातील विद्यार्थ्यांची भोजनाची व्यवस्था करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून सुरुवातीला जेवण सुरू करण्यात येईल. तसेच आयटीआयमधील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिल्यानंतर जागा शिल्लक राहिल्यास अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, असे आश्वासन वायकर यांनी या वेळी दिले. यामुळे या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात मोठय़ा संख्येने बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambernath iti hostel open in a month
First published on: 24-07-2015 at 12:02 IST