शौचालय बांधण्यात विक्रम करणाऱ्या पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

एकीकडे राज्यात सर्वाधिकशौचालय बांधून राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेने  अंबरनाथ रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांकएकजवळील स्वामीनगर झोपडपट्टीतील बांधलेल्या शौचालयाच्या दुरवस्था आणि दरुगधीने नागरिकांसह रेल्वे प्रवाशी हैराण झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी अंबरनाथ नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिका क्षेत्रात सर्वाधिकशौचालय बांधल्याचा विक्रम केला होता. त्यामुळे केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी पालिकेच्या कार्याचे कौतुक केले होते. मात्र नवे शौचालये बांधण्यात पालिकेने आघाडी घेतली असली तरी आधीच अस्तित्वात असलेल्या शौचालयांकडे लक्ष देण्यास पालिका प्रशासनाला मात्र वेळ नसल्याचे समोर येत आहे.

अंबरनाथ रेल्वे स्थानकाशेजारीच स्वामीनगर ही झोपडपट्टी आहे. रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकला लागूनच काही फुटांवर ही झोपडपट्टी सुरू होते. तेथेच एक सार्वजनिक शौचालयही आहे.

या शौचालयाचा मैला वाहून नेणाऱ्या पाइपला जोडणी नसल्याने शौचालयाचा सर्व मैला थेट बाहेरच्या नाल्यात सोडला जातो. सकाळी शौचालयाच्या अधिक वापराच्या वेळी येथे मोठय़ा प्रमाणावर दरुगधी पसरते. त्यामुळे रेल्वे प्रवासी तसेच झोपडपट्टीतील नागरिकांनाही या दरुगधीमुळे मोठय़ा प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागते. अनेकदा नागरिक आपल्या घराच्या खिडक्याही उघडू शकत नाहीत. त्यामुळे यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

याबाबत पालिकेच्या विवेक विसपुतेंशी संपर्क केला असता, तो होऊ  न शकल्याने प्रतिक्रिया कळू शकली नाही. मात्र या शौचालयाची दुरुस्ती याआधीही केली होती, मात्र स्थानिकांच्या दुर्लक्षामुळे याची दुरवस्था झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून कळते आहे.