दोनच प्रवासी घेऊन वाहतूक, लाल बावटा रिक्षा संघटनेची सूचना

डोंबिवली : करोना संसर्गामुळे कठोर निर्बंध लागू होताच, डोंबिवलीतील रिक्षा संघटनांनी आपल्या सदस्यांना दोन प्रवासी घेऊन प्रवासी वाहतूक करण्याच्या सूचना केल्या आहेत. अनेक महिने प्रति प्रवासी २० रुपये भाडे देऊन त्रस्त झालेले प्रवासी रिक्षा चालकांकडून पुन्हा सुरू करण्यात आलेल्या या प्रकारामुळे हैराण झाले आहेत. सोमवारपासून डोंबिवलीत या विषयावरून प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये भांडणे सुरू झाली आहेत. गेल्या वर्षी जूनपासून रिक्षा चालकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी एका रिक्षेत दोन प्रवासी घेऊन प्रति प्रवासी २० रुपये भाडे घेण्यास सुरुवात केली होती. प्रवाशांनी २० रुपये भाडे अनेक महिने दिले. रिक्षा चालकांना एक फेरीत ४० रुपये मिळत असल्याने चालक खूष होते. करोना निर्बंध उठल्यानंतरही रिक्षा चालकांनी तीन प्रवासी आणि शेअर भाडे घ्यावे म्हणून प्रवासी प्रयत्नशील होते. त्याला रिक्षा चालक दाद देत नव्हते. दररोज चाळीस रुपये खर्च करणे शक्य नसल्याने बहुतांशी नोकरदार पायपीट करत होता.  गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शेअर भाडे लागू झाल्यापासून रिक्षा चालकांनी दोन आसन क्षमतेवर प्रवासी भाडे घेणे बंद करून तीन आसनावर प्रवासी घेऊन शेअर पद्धतीने भाडे आकारणीस सुरुवात केली होती.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
With restrictions on the export of non basmati rice the demand from the domestic market also declined Pune news
आंबेमोहर, कोलमचे दर घसरले; जाणून घ्या, ग्राहकांना काय फायदा होणार ?

दोन दिवसापूर्वी शासनाचे कठोर निर्बंध लागू झाल्या बरोबर डोंबिवलीतील लाल बावटा रिक्षा संघटनेने सदस्यांना करोनाचा वाढता धोका विचारात घेऊन रिक्षात दोन प्रवासी घेऊन प्रवासी वाहतूक करण्याच्या सूचना केल्या. या आदेशामुळे इतर रिक्षा संघटनांमध्ये अस्वस्थता पसरली. डोंबिवली पूर्व, पश्चिमेत काही रिक्षा वाहनतळांवर चालक मनमानी करून दोन प्रवासी घेऊन वाहतूक करत आहेत. प्रति प्रवासी २० रुपये भाडे आकारत आहेत. 

डोंबिवलीतील रिक्षा चालकांवर उपप्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस यांचा अंकुश नाही. रिक्षा चालकांच्या मनमानीची आपण परिवहन आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत. भाडय़ावरून नेहमीच प्रवाशांची पिळवणूक करणाऱ्या रिक्षा चालकाच्या विषयावरून उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

– लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरी महिला रेल्वे प्रवासी संघटना

रिक्षा चालकांनी तीन प्रवासी आणि ठरलेल्या शेअर दराप्रमाणे प्रवासी वाहतूक करावी. मनमानीने नियम करून कोणीही रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करत असेल, प्रवाशांशी वाद घालत असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.

– तानाजी चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

सार्वजनिक वाहूतक ५० टक्के क्षमतेने चालवा असे शासनाचे आदेश आहेत. त्याचे पालन करण्याचे ठरवले होते. पण आरटीओ अधिकारी तीन प्रवासी घेऊन प्रवास करण्याचे सुचवत आहेत. आम्ही चालकांना कोणत्याही सूचना केल्या नाहीत. गोंधळ आरटीओ पातळीवर आहे.

– काळू कोमास्कर, अध्यक्ष, लाल बावटा रिक्षा संघटना.