ठाणे : करोनाकाळात महापालिकेच्या केवळ मालमत्ता कर आणि पाणी देयकांची अपेक्षित कर वसुली झाली होती. करोना निर्बंधमुक्त झाल्यानंतर मात्र उलट चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या या दोन्ही विभागांनी पुढील कर वसुलीसाठी आतापासूनच पावले उचलली असून थकबाकीदारांच्या वसुलीवर भर देण्याचे नियोजन केले आहे. येत्या काही दिवसांत पालिकेकडून अशा थकबाकीदारांवर कारवाई सुरू होण्याची चिन्हे आहेत.
ठाणे महापालिकेच्या २०२१-२२ या वर्षांच्या अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता कर विभागाला ६५० कोटींचे, तर पाणी विभागाला १५८ कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात मालमत्ता कर विभागाने ६१३ कोटी ९२ लाख रुपयांची कर वसुली केली आहे, तर पाणी देयकांची ११६ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ही कर वसुली कमी असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी नुकतीच एक बैठक घेऊन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत कर वसुलीवर भर देण्याच्या सूचना संबंधितांना केल्या. यावेळी वसुलीसाठी प्रामाणिक प्रयत्न करून जास्तीत जास्त वसुली करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक करत कमी वसुली केलेल्या कर्मचाऱ्यांना ताकीद दिली.
प्रत्येक प्रभाग समितीनिहाय वेळेत देयके छपाईसाठी देऊन २६ तारखेपर्यंत ९० टक्के बिलांचे वितरण करून वसुली सुरू करावी. तसेच शहरातील थकबाकीदारांवर १५ मेपर्यंत त्यांच्यावर धडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ज्यांचे धनादेश वटले नाहीत, त्यांना एप्रिलपर्यंत मुदत द्यावी. अन्यथा मे महिन्यात संबंधित थकबाकीदारावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अस्तित्वातील मालमत्तांची वसुली करण्याबरोबरच नवीन मालमत्तांची कर आकारणी करून तसे प्रमाणपत्र संबंधित कर निरीक्षकांनी एप्रिल महिन्याअखेर सादर करावे. त्याचबरोबर सोसायटय़ांना स्वतंत्र देयके वितरित करणे, ५०० चौरस फूट क्षेत्रफळ असणाऱ्या मालमत्ताच्या नोंदी तात्काळ पूर्ण करणे, तुटलेल्या मालमत्ताची नोंदणी कमी करणे तसेच वापरात बदल किंवा अनिवासी भाडेतत्त्वावरील कर आकारणीची कार्यवाहीही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
१०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट
• पाणी देयके वेळेत वितरण करून शंभर टक्के वसुली करण्याचे तसेच मोठय़ा थकबाकीदारांवर धडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी संबंधितांना बैठकीत दिले.
• प्रत्येक प्रभाग समितीनिहाय ५ मेपर्यंत जलमापके नसलेल्या ग्राहकांना देयकाचे वितरण करणे, जलमापकांची नोंदणी घेणे, देयक तयार करणे, बेकायदेशीर नळजोडणी शोधून त्यांच्यावर कारवाई करणे, वापर बदलांची नोंद घेऊन देयके तयार करणे तसेच पाणी देयक वसुलीच्या कामाला प्राधान्य देणे असे आदेशही त्यांनी दिले.
• शहरातील ज्या सोसायटय़ांमध्ये वैयक्तिक पाणी देयकांची थकबाकी आहे, त्या सदनिकाधारकांची नावे जाहीर करून त्यांच्यावरही यापुढे कडक कारवाई करण्याचे तसेच दैनंदिन वसुली व थकबाकीदारांवर केलेल्या कारवाईचा अहवाल आठवडय़ाला सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.