प्रशस्त असे प्रवेशद्वार.. आत प्रवेश करताच मोठे पटांगण..पटांगणात उंबराचे झाड.. झाडाच्या भोवताली पार.. हे कुठल्या गावाचे वातावरण नाही, तर डोंबिवली पश्चिमेतील मांगल्य सोसायटीच्या परिसरात असे मन प्रफुल्लित करणारे वातावरण आहे. आठ इमारतींचा भव्य पसारा असूनही येथील नागरिकांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने एकोपा जपलेला आहे. माणुसकीचा ओलावा येथील नागरिकांमध्ये भरभरून वाहत असून त्यांच्या या स्वभावाने सोसायटी परिसरात मांगल्य नांदत असल्याचे जाणवते.

मांगल्य गृहसंकुल, गरिबाचा वाडा, डोंबिवली (पश्चिम)

डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा वाडा परिसरात मांगल्य गृहसंकुल मोठय़ा दिमाखात उभे आहे. फेज एक व दोन अशी त्यांची विभागणी केली असून या संकुलात एकूण ८ विंग, १५२ सदनिका आणि दुकाने आहेत. २००० मध्ये विकासक प्रकाश मावानी यांनी हे संकुल उभारले. २००२ मध्ये नागरिकांनी अगदी चार ते पाच लाख रुपयांना येथे घरे विकत घेतली. त्यातील बहुतेक नागरिक हे डोंबिवलीतील स्थानिक आहेत. चाळीतून किंवा सोसायटींतून प्रशस्त अशा खोल्या मिळत असल्याने नागरिकांनी या संकुलात घर घेणे पसंत केले. सुरुवातीला येथे राहायला आलो तर कुठे तरी लांब घर घेतले आहे असे वाटायचे. आजूबाजूला चाळी होत्या, खाडीकिनारा जवळ असल्याने दलदलीचा भाग जास्त प्रमाणात होता. येथील रस्ताही मातीचा होता. पावसाळ्यात चिखल तुडवतच आम्हाला स्टेशन गाठावे लागत असे; परंतु २००५ मध्ये रस्त्याचे डांबरीकरण झाले आणि चांगला रस्ता नागरिकांना मिळाला. तसा हा परिसर शांतच आहे, परंतु पूर्वी फार शुकशुकाट असायचा. महिलांना सायंकाळी बाहेर पडणे म्हणजे धोकादायक वाटायचे; परंतु एक-दोन वर्षांत आजूबाजूची रहदारी वाढल्याने आता रात्री कधीही तुम्ही या, कोणताही धोका येथे जाणवत नाही, असे येथील नागरिक सांगतात.
दहा-बारा वर्षांपूर्वी डोंबिवली शहरात परिस्थिती वेगळी होती. केवळ चार ते पाच मजली इमारती तुम्हाला दिसून यायच्या. त्यामानाने डोंबिवली पूर्व शहराचा विकास जोरात सुरूहोता. ग्रामीण भागात मोठमोठी संकुले उभी राहात होती. डोंबिवली पश्चिम हा तसा गावठाण भाग असल्याने विकासक येथे प्रकल्प उभारण्यास तयार नव्हते; परंतु डोंबिवली पश्चिमेला पहिलेच कोणते मोठे संकुल झाले असेल तर ते म्हणजे मांगल्य गृहसंकुल. चार मजली इमारत असलेल्या एकूण ८ सदनिका एका कुंपणाच्या आत, तेसुद्धा प्रशस्त अशा जागेत मोठय़ा दिमाखात उभ्या राहिल्याने त्यात घर घ्यावे असे कोणत्याही मध्यमवर्गीय नागरिकांना नक्कीच वाटले असते. त्यामुळे येथील चाळीतील नागरिकांनी तसेच छोटय़ा इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी या गृहसंकुलात आपली जमापुंजी गुंतवत घर घेतले. आता याच घरांची किंमत चाळीस लाखांच्या घरात गेली आहे. येथे घर घेतले आणि आमच्या जीवनात चैतन्यच चैतन्य आल्याचे रहिवासी सांगतात. मांगल्य या नावाप्रमाणेच या सोसायटीचा परिसर आहे. सोसायटीत प्रवेश करताच प्रशस्त अशी मोकळी जागा दिसते. त्यात बाजूला मोठमोठे वृक्ष आपल्या वृक्षांच्या गर्द छाया या घरांवर पसरत असल्याचे दिसते. या झाडांना पार केलेले असल्याने जसे काही गावात आल्याची जाणीव करून देते. या पारावर सकाळी संध्याकाळी नागरिक बसून गप्पा मारताना दिसतात. लहान मुलेही झाडाच्या पारावर विविध खेळ खेळताना दिसतात. यासोबतच सोसायटीच्या चहूबाजूने नारळाची मोठमोठी झाडे असल्याने मिनी कोकणात आल्याचा भास होतो. नारळीच्या- पोफळीच्या या बागा, खाडीवरून वाहणारा मंद वारा मन प्रसन्न करते. लहान मुलांना खेळण्यासाठी लहान बगिचाही बनविण्यात आला आहे.
१५२ घरे असून त्यात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मराठी सणांसोबतच इतर धर्मीयांच्या सणांनाही तेवढेच महत्त्व दिले जात असल्याने कार्यक्रमात सर्वच नागरिक हिरिरीने भाग घेतात. नुकतीच सोसायटीच्या महिलांची एक समिती स्थापन झाली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात महिलांचा पुढाकार महत्त्वाचा असतो. सत्यनारायणाची पूजा, २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, होळी, रंगपंचमी, नवरात्र, गणेशोत्सव आदी सर्व सण मोठय़ा उत्साहात साजरे होतात. ज्येष्ठ नागरिक रहिवाशांची संख्याही येथे मोठय़ा प्रमाणात असल्याने त्यांना मानाचे स्थान दिले जाते. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला ज्येष्ठ महिला व पुरुषांच्या हस्ते झेंडावंदन केले जाते. अनुजा पाडेकर, शर्मिला तोंडवळकर, सुधा महामुणकर, वैभवी जाधव, सुप्रिया पाटील, सीमा पाटील, मनीषा परब, दीक्षा काटकर या महिलांचा प्रामुख्याने यात सहभाग असतो. संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, रस्सीखेच आदी स्पर्धा तर घेतोच, परंतु महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी टाकाऊपासून टिकाऊ, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा यांसारख्या स्पर्धाचेही आयोजन केले जात असल्याचे त्या सांगतात. तरुणांचेही सहकार्य आम्हाला मिळत असून वार्षिक स्नेहसंमेलनाला सहा ते सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याची सर्व धुरा या तरुणांच्या खांद्यावर असते. या संकुलात विविध धर्माचे नागरिक राहात असल्याने सर्वासाठी एक दिवस वेशभूषेचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या वेळी नागरिक आपल्या पारंपरिक वेशभूषेत येऊन आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतात.
स्थानकापासून हा परिसर दूर असला तरी येथे सोयीसुविधांची कमतरता जाणवत नाही. स्टेशनपासून येथे येण्यासाठी रिक्षा तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन बसची सुविधा आहे. परिसरात जवळच खासगी शाळा, मैदान असल्याने मुलांच्या शिक्षणात तशा अडचणी येत नाहीत; परंतु शाळा संपल्यानंतर महाविद्यालयासाठी मुलांना डोंबिवली पूर्वेचा सहारा घ्यावा लागतो. भाजी मार्केटही स्टेशन परिसरात आहे, परंतु उमेशनगर परिसरात बुधवार, शुक्रवार, रविवार बाजार भरत असल्याने मच्छी तसेच भाजी बाजारात उपलब्ध होते. छोटेमोठे दवाखाने येथे आहेत, तसेच एक खासगी रुग्णालय असल्याने अडीअडचणीला ते उपयोगी पडते. परिसर तसा शांत असल्याने येथे सुरुवातीला महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता. कधी कोणतीही चोरीची घटना घडली नसली तरी आम्ही सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली असल्याचे विजय पेडणेकर यांनी सांगितले. तसेच वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु सोसायटीच्या आवारात वाहने उभी करण्याची चांगली व्यवस्था आहे.
संकुलाचा पसारा मोठा असल्याने त्याचे फेज एक व दोन असे भाग करण्यात आले आहेत. या दोन्ही फेजच्या वेगवेगळ्या कमिटय़ा आहेत. फेज एकचे अध्यक्ष मधुकर महामुणकर, सचिव दयानंद डंके, खजिनदार गणेशन हे तसेच फेज दोनचे अध्यक्ष विजय पेडणेकर, सचिव जनार्दन टक्के, खजिनदार नितीन बावकर हे आहेत.

cancer, Nagpur, cobalt devices,
नागपुरात कर्करुग्णांचे हाल थांबणार कधी? कालबाह्य कोबाल्ट यंत्रावरच…
nagpur tekdi ganpati mandir marathi news, tekdi ganpati mandir sprinkler marathi news
नागपूर: तळपत्या उन्हातही टेकडी गणपती मंदिर परिसर थंडा थंडा कुल कुल… स्प्रिंकलरमुळे भाविक गारेगार…
22 high tide days during monsoon
यंदा समुद्राला पावसाळ्यात २२ दिवस मोठी भरती…२०,२१ सप्टेबरला जुलैला सर्वात मोठी उधाणे, सुमारे पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार
Potholes on Mangalwar Bazar flyover road in nagpur
उदंड झाली वाहने अन् रस्त्यावर खड्डेच खड्डे! उपराजधानीतील सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावर…

विहिरीच्या पाण्याचा वापर
सध्या पाण्याची टंचाई भासत असून येथील नागरिकांनी त्यावर एक उत्तम उपाय शोधून काढला आहे. संकुलाच्या परिसरात जुनी विहीर असून या विहिरीचे पाणी येथील नागरिक इतर गोष्टींसाठी वापरतात. पाण्याची टंचाई सर्वत्रच असून पालिकेच्या वतीने होणारा पाणीपुरवठा आम्ही पिण्यासाठी वापरतो. फेज एकसाठी कूपनलिकेचे पाणी आणि फेज दोनसाठी विहिरीचे पाणी सध्या नागरिक वापरत आहेत. हे विहिरीचे पाणी पाइपलाइनच्या माध्यमातून घराघरांत पोहोचविण्याचे काम येत्या काही महिन्यांत करण्यात येणार असल्याचे मधुकर महामुणकर यांनी सांगितले. या विहिरीची साफसफाई सोसायटीच्या निधीतून करण्यात आली आहे व त्याची देखभाल दुरुस्तीही याच निधीतून करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. पालिकेला सोसायटी दरवर्षी पाच लाखांच्या आसपास कर भरला जातो; परंतु आमचा कन्व्हेन्स डीडचा प्रश्न अद्याप बाकी असून त्यासाठीही प्रथम प्रयत्न करण्यात येणार आहेत. येथील नागरिकांमध्ये एकोपा असून २६ जुलैच्या पावसात इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आले होते. त्या वेळी सोसायटीतील नागरिकांनी सोसायटीतील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना इमारतीच्या गच्चीवर राहण्याची व्यवस्था केली होती. तसेच सोसायटीत कोणतीही सुखदु:खाची घटना घडली तरी सर्व जण एकमेकांच्या मदतीला धावून येत असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.