दर आठवडय़ाला अत्रे कट्टा किंवा ब्रह्मांड कट्टय़ावर कोणता कार्यक्रम आहे हे आवर्जून पाहायचे आणि आवडीचा कार्यक्रम असेल तर वेळ काढून नक्की जायचे अशी काही ठाणेकरांची सवय.. तर काही ठाणेकर कुठलाही कार्यक्रम असो न चुकता कट्टय़ावर जायचे असे ठरवून ठेवतात. ठाण्यात अशा प्रकारचे कट्टे आठवडय़ाला किंवा काही ठिकाणी पंधरवडय़ातून, महिन्यातून एकदा भरवले जातात. हे साहित्यिक कट्टे रसिकांनी नेहमीच गजबजलेले असतात. अनेक वेळा ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असते, पण रसिकांना वय नसते. कलावंताला योग्य वेळी टाळी मिळाली की त्याचा कार्यक्रम बहरून येतो. योग्य वेळी टाळी देणारा रसिक वर्ग या कट्टय़ावर असतोच.
भास्कर कॉलनीमध्ये सुरू असलेल्या अत्रे कट्टय़ाने नुकतेच ई पाऊल उचलले आहे. एक वेबसाइट तयार करून कट्टय़ाने ई भरारी घेतली आहे. ब्रह्मांड कट्टय़ावर एका ग्रंथालयाची सुरुवात करण्यात आली आहे. या ग्रंथालयासाठी सर्वानी एखादे पुस्तक भेट द्यावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. आपल्या कपाटातील पुस्तकं आपण आयुष्यभर जपत असतो. अनेकांची घरं पुस्तकांनीच भरलेली आहेत. अनेकांचा जीव की प्राण असलेली पुस्तकं कधी तरी ठेवायची कुठे अशी अडचण निर्माण होते. घर बदलताना अगदी सर्वच पुस्तकं सांभाळता येत नाहीत. अशा पुस्तकांच्या संग्रहातून या ब्रह्मांड कट्टय़ावर ग्रंथालय उभे राहते आहे.
या दोन्ही कट्टय़ांसह अभिनय कट्टासुद्धा ठाण्यात सुरू असून त्यानेही नाटय़ रसिकांसाठी एक चांगले व्यासपीठ उभे करून दिले आहे. तसेच ठाण्यातील नाटय़, सिने कलावंतांनी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी एकत्र येऊन एक टॅग नावाची संस्था सुरू केली आहे. या टॅगच्या माध्यमातूनही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
ठाण्यातील नवीन कलाकार, लेखक, कवी यांना या कट्टय़ांनी एक व्यासपीठ उपलब्ध करून देऊन या शहराच्या नाटय़संस्कृतीमध्ये मोठी भर टाकली आहे. कारण याच कट्टय़ावरून नवनवीन कलाकार येत आहेत. आपली कला सादर करून एकदा आपल्याला चाचपून पाहत आहेत. तर काही नावाजलेले कलावंत, लेखकही या कट्टय़ावर येत आहेत. त्यामुळे रसिकांना एक साहित्यिक मेजवानी मिळते आहे. अलीकडच्या काळात सुरुवात होऊनही या कट्टय़ांनी सतत आणि सातत्याने विविध कार्यक्रम, उपक्रम राबवून रसिकांशी असणारी बांधीलकी जोपासली आहे. दर्दीच्या गर्दीने हे कट्टे नेहमी भरलेले असतात
ठाण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद, कोकण मराठी साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या शाखा आहेत. या तिन्ही संस्था मान्यवर असून त्यांचे काम अखिल भारतीय स्तरावर आहे. पण वर्षांची कार्यकारिणी जाहीर होण्यापलीकडे या शाखांनी कोणताही ठोस उपक्रम राबविल्याचे दिसत नाही. आज नाटय़, लेखन, कविता, चित्रपट, संगीत, चित्रकला या क्षेत्रांत नावाजलेले कलावंत ठाण्यात वास्तव्यास आहेत. यातील अनेक जण या संस्थांच्या शाखांशी जोडलेलेही नाहीत. कट्टय़ावरचे निमंत्रण मिळाल्यास मात्र ते आनंदाने कट्टय़ावर आपले विचार मांडतात, अगदी मानधन न घेताही अनेक जण कार्यक्रम सादर करतात. अनेक नवीन कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी ही मोठी माणसे कट्टय़ावरच्या कार्यक्रमातही सहभागी होतात.
जे काम नावाजलेल्या संस्थांनी करायचे ते काम कट्टे करत आहेत. कट्टे जोमात आणि या शाखा कोमात असे चित्र सध्या ठाण्यात पाहायला मिळते आहे.    ’
प्राची -prachi.mushafiri@gmail.com