मधुमेह, रक्तदाब आणि इतर आजारपणांमध्ये गोळ्या-औषधे आणि पथ्यपाण्याबरोबरच हल्ली हटकून डॉक्टर्स नियमित चालण्याचा सल्ला देतात. समर्थ रामदासांनी ‘प्रभाते मनी राम चिंतित जावा’ असा मौलिक सल्ला सज्जनांना फार पूर्वी दिला आहेच. मात्र आरोग्य सुदृढ राहण्यासाठी रामप्रहरी चालणे हिताचे ठरते, हे आधुनिक वैद्यकशास्त्रानेही आता मान्य केले आहे. त्यामुळे आता बाराही महिने शहरातील एखाद्या बागेत, मैदानात लोक भल्या पहाटे चालताना दिसतात. सध्या थंडीच्या दिवसांत वॉकर्सची संख्या अधिक असते. आता अनेक उद्यानांत चालण्यासाठी विशेष ट्रॅकची व्यवस्था करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्व येथील अष्टगणेश उद्यानातही व्यायाम आणि चालण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची चांगलीच सोय झाली आहे.

अष्टगणेश उद्यान, डोंबिवली (पूर्व)

हल्ली उद्यानात ओपन जिम संस्कृतीचा प्रसार झाला आहे. डोंबिवली पूर्व विभागातील या उद्यानातही ती व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरातील महिलावर्ग त्याचा मोठय़ा प्रमाणात वापर करताना दिसतात. या उद्यानात एक फेरी पूर्ण केल्यास अर्धा किलोमीटर अंतर पार होते. बहुतेक जण मैदानाभोवती साधारणत: १४ ते १५ फेऱ्या मारतात. त्यामुळे सात ते साडेसात किलोमीटर अंतर चालण्याचे समाधान मिळते. त्यामुळे श्वसनक्रिया सुधारते. शारीरिक स्वास्थ्य संतुलित राहतेच, पण त्याचबरोबर मनाचे आरोग्यही निकोप राहते. या उद्यानापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सावरकर उद्यानात व्यायाम करण्याची सोय नसल्याने त्या परिसरातील नागरिकही येथे येतात. येथे पिण्याच्या पाण्याची सोय आहे. मात्र नळ एका कोपऱ्यात असल्याने फिरायला येणाऱ्या नागरिकांना तो चटकन दिसत नाही. तो दिसेल अशा ठिकाणी असावा. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, असे येथे नियमित येणाऱ्या एका नागरिकाने सांगितले. नेहमी येणाऱ्यांनी येथे आपापली मित्रमंडळी जमवली आहे. त्यामुळे व्यायामाचा उपचार उरकला की, येथे घोळक्याघोळक्याने छान गप्पांचे फड रंगलेले दिसतात. येथे लहान मुलांना खेळण्यासाठीही सुविधा उपलब्ध आहे.

छोटय़ा जागेचा किती चांगल्या पद्धतीने वापर करता येतो, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हे उद्यान आहे. हल्ली अनेक उद्यानांत हास्य क्लब असतात. तशी या उद्यानातही हास्ययोगाची साधना काही जण नियमितपणे करीत असतात. त्यामुळे दिवसभर ताजेतवाने राहता येते. सकाळी लवकर उठल्याने रात्री लवकर झोप येते. त्यामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. मात्र येथे झाडांची हवी तशी काळजी घेतली जात नाही. पावसाळ्यात वाढलेले गवत अजूनही तसेच आहे. त्यामुळे त्यात साप-विंचवासारखे उपद्रवी प्राणी दडून बसण्याची भीती असते. त्यासाठी वाढलेले गवत वेळोवेळी काढून टाकणे आवश्यक आहे. मग नागरिकांना सापाची भीती वाटणार नाही. त्याचप्रमाणे ओपन जिममध्ये जी व्यायामाची साधने आहेत, त्यांचीही नियमितपणे देखभाल करणे आवश्यक आहे, कारण त्यांची बेरिंग्ज खराब होतात. उद्यानाबाबत नागरिक समाधानी आहेत. मात्र चालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गाची नीट डागडुजी करणे आवश्यक आहे. शिवाय या उद्यानात करमणुकीची कोणतीही सोय नाही. अनेक जण कानात इअरफोन घालूनच चालतात. पहाटेपासून सकाळी दहापर्यंत आणि संध्याकाळी साडेचारपासून उद्यानात नागरिकांना प्रवेश दिला जातो. मर्यादित वेळांमुळे उद्यानाची चांगली निगा राखली जाते. पावसाळ्यात मात्र गैरसोय होत असल्याचे काहींनी सांगितले. व्यायाम करण्याबरोबरच सध्या एकोपा जपणे गरजेचे आहे. ब्लॉक सिस्टीममुळे आजूबाजूला कोण राहते याची माहिती नसते. मात्र सकाळी चालायला आल्याने ओळख वाढते.

नवे मित्र जोडता येतात. त्यामुळे सकाळी उद्यानात येणे अधिक आवडत असल्याचेही ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. या उद्यानाजवळ कोणतेही आयुर्वेदिक काढे मात्र मिळत नाहीत. त्यामुळे सकाळी सकाळी कडुनिंब अथवा तत्सम रस अथवा काढय़ांसाठी नागरिक सावरकर रोड उद्यानाजवळ जातात.

एक मोठी उणीव मात्र या उद्यानात आहे, ती म्हणजे येथे शौचालयाची सोय नाही. त्यामुळे ज्येष्ठांची अडचण होते. लवकरात लवकर ही सुविधा येथे उपलब्ध करून द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

चालण्याचा वेग वाढला..

मी नियमितपणे चालायला येतो. मधुमेहामुळे माझ्या पायाच्या नसांना त्रास झाला होता. उभे राहण्याचीही ताकद नव्हती, परंतु रोज चालायला येत असल्याने माझा चालण्याचा वेग वाढला आहे. पूर्वी जे अंतर पार करायला ३५ मिनिटे लागत होती, ते आता अवघ्या दहा मिनिटांत पूर्ण करतो.

– अरविंद बुलबुले

मैत्रिणीही भेटतात..

चालणे होतेच. शिवाय सकाळी मैत्रिणीही भेटतात. त्यामुळे दिवस आनंदात जातो. ३०-३५ मिनिटे चालल्यानंतर १५-२० मिनिटे व्यायाम करते. त्यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते. स्टॅमिना वाढला आहे.

– शांताबाई नारखेडे

यंत्राचाही वापर..

माझे वय ८८ वर्षे आहे. मात्र तरीही दररोज सकाळी उठून चालणे हा माझा नियम आहे. सकाळी चालल्याने, मोकळ्या हवेत फिरल्याने बरे वाटते. या उद्यानात व्यायाम करण्यासाठी यंत्रे बसवलेली आहेत. त्या यंत्राचाही मी थोडय़ा प्रमाणात वापर करतो. त्यामुळे आनंद मिळतो.

– पुरुषोत्तम खांडेकर


झाडांची काळजी घ्यावी..

येथे पाण्याची सुविधा नाही. त्यामुळे चालण्यासाठी येताना सोबत पाण्याची बाटली आणावी लागते. शिवाय झाडांची काळजी घेतली जात नाही. एकूणच उद्यानाची देखभाल चांगल्या प्रकारे व्हावी असे वाटते.

– नीलेश बढे