ठाणे : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेने महाआवास अभियानाची यशस्वी अंमलबजावणी केल्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेला प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्वोत्कृष्ट जिल्हा या पुरस्कार गटात तिसरा क्रमांक, तर ‘सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत’ या पुरस्कार गटात भिवंडी तालुक्यातील  चिंचवली ग्रामपंचायतीस प्रथम पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली. केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांना गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात आले. सर्वासाठी घरे २०२२ या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात आले होते.

 या अभियान कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर या तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष कामांची पाहणी केली. वेळोवेळी यंत्रणाना सूचना केल्या, तसेच साप्ताहिक आढावा बैठकीसह या अभियानासाठी स्वतंत्र बैठकांचे आयोजन करून कामांमध्ये गतिमानता आणण्यासाठी आग्रही राहिले. त्यामुळे शासनाने सांगितलेल्या उपक्रमांची ग्रामीण विकास यंत्रणेने उत्कृष्ट अंमलबजावणी केली. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १०५७ घरकुले पूर्ण केली आहेत. तर ३९ भूमिहीन कुटुंबाला हक्काची जागाही उपलब्ध करून देण्यात आली. सध्या या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू असून यामध्ये उत्कृष्ट कामाचे नियोजन केले आहे.  दुसऱ्या टप्प्यात १७५ घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत, तसेच या अभियानांतर्गत शिल्लक १५ भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा चालू आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली.

एकूण ९ हजार ६१० घरांची बांधणी

 ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात एकूण ९ हजार ६१० घरे बांधण्यात आली. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची ६ हजार ३३७ आणि राज्य पुरस्कृत ३ हजार २७३ घर बांधण्यात आली. या अभियान काळात डेमो हाऊस, घरकुल मार्टची उभारणी तसेच लाभार्थ्यांचे मेळावे आयोजित करून अभियानाबाबत जागृतीही करण्यात आली. त्याचबरोबर प्रत्येक घराच्या भिंतीवर वारली चित्रे रेखाटण्यात आली.