गुरुत्वीय पद्धतीने पाणी खेचून गावपाडय़ांना पुरवठा
मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा, वैतरणा आणि भातसा अशा मोठय़ा धरणांनी व्यापलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर तालुक्यातील गावपाडे मात्र, वर्षांचे आठ महिने तहानलेले असतात. या पाश्र्वभूमीवर तालुक्यालगत घाटमाथ्यावर असलेल्या बाहुली धरणातून गुरुत्वीय पद्धतीने पाणी आणून त्याद्वारे दुर्गम भागातील गावपाडय़ांना पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली असून त्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून सकारात्मक निष्कर्ष हाती आले आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्यात ठाणे जिल्हा परिषदेतर्फे या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारपुढे मांडण्यात येणार आहे. तो मंजूर झाल्यास मुंबई-ठाण्याला पाणी पुरवणाऱ्या शहापूरची तहानही भागू शकेल.
तीन मोठी धरणे असूनही शहापूर तालुक्याला पाणीटंचाईची सर्वाधिक झळ पोहोचते. जिल्हा प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार तालुक्यातील १९६ गावपाडय़ांना उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवावे लागते. त्यातील बहुतेक गावे डोंगरमाथ्यावर उंच ठिकाणी आहेत. तालुक्यातील सर्व जलाशय सखल भागात आहेत. तिथून पाणी वर चढविणे व्यावहारिकदृष्टय़ा अशक्य आहे. त्यामुळेच काही गावांना टँकरद्वारेच पाणीपुरवठा करावा लागतो. या पाश्र्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत शहापूरमधील बाहुली धरणाचे पाणी गुरुत्वीय पद्धतीने खेचून गावांना पाणीपुरवठा करण्याची योजना मांडण्यात आली होती. या संदर्भात नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. बाहुली धरण उंचावर असल्याने या भौगोलिक अडचणीवर मात करणे शक्य आहे. तिथून गुरुत्वीय पद्धतीने तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करता येऊ शकतो, असा निर्वाळा सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही ही योजना पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी १३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेच्या वतीने या संदर्भातील प्रस्ताव शासनाला सादर केला जाणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मदतीने गावाच्या वेशीपर्यंत पाणी दिले जाईल. तिथून घरोघरी पाणी वाहून नेण्याची जबाबदारी त्या त्या ग्रामपंचायतींना पार पाडावी लागेल, अशी माहिती सर्वेक्षणात सहभागी असलेल्या एका सदस्याने दिली.
फक्त १५ टक्के पाणी वापरणार
बाहुली धरणातील अवघ्या १५ टक्के पाण्याने शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या दूर होणार आहे. तालुक्याच्या वेशीवर इगतपुरी तालुक्यात असणारे हे धरण पाटबंधारे खात्याच्या अखत्यारीत आहे. सध्या पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याने तसेच कोणतेही नुकसान होणार नसल्याने ही योजना मार्गी लागण्यात फारशी अडचण येणार नाही, असा विश्वास संबंधितांनी व्यक्त केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2015 रोजी प्रकाशित
शहापूरची तहान भागवण्यासाठी ‘बाहुली’ची मदत!
तीन मोठी धरणे असूनही शहापूर तालुक्याला पाणीटंचाईची सर्वाधिक झळ पोहोचते.
Written by झियाऊद्दीन सय्यद
First published on: 16-12-2015 at 00:39 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bahuli dam supply water to shahapur