चैत्रपालवी अर्थात बहर, झाडांना फुटलेली नवी पालवी दिसली की वेध लागतात ते चैत्र महिन्याचे. गुलमोहर जसा बहरायला लागतो, तसा हा बहर सृष्टीमध्ये दिसून येत आहे. लालचुटुक, पिवळाभोर बहरलेला गुलमोहर पाहिला की, मनाला एक उभारी मिळते, चैतन्य मिळते. असेच चैतन्य आणणारा सण म्हणजे गुढीपाडवा. भारतीय नववर्षांची सुरुवात. या नव्या वर्षांच्या उत्साहाबरोबरच मराठी अस्मितेचा जागर या निमित्ताने ठाणेकर अनुभवत आहेत.
कोणताही सण असो, मग भारतीय नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याचे स्वागत असो की ३१ डिसेंबरची रात्र असो, उत्सवप्रिय ठाणेकर तो आनंद रस्त्यावर उतरून साजरा करणारच. ठाणे हे जसे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते तसेच ठाणे हे उत्सवांचे शहर म्हणूनही आपली ओळख निर्माण करू लागले आहे. नऊवारी साडी, नाकात नथ अशा पारंपरिक महाराष्ट्रीय वेशभूषा करून सहभागी झालेले ठाणेकर ढोलताशा वाजवीत, लेजिम खेळत मराठी परंपरा जपण्याचा ठाणेकरांचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
गेल्या १३ वर्षांपासून कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने स्वागत यात्रा काढली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून या स्वागत यात्रेत महिला ढोलताशा पथक हे आकर्षण ठरणार आहे. लहान मुलींपासून ते ज्येष्ठ महिला या ढोलताशा पथकात मोठय़ा उत्साहाने सहभागी होत असतात. यंदाही सात ढोलताशा पथके सहभागी होऊन या स्वागत यात्रेची शोभा अधिकच वाढवणार यात शंका नाही. शिवरुद्र ढोलताशा पथक, अग्नी एक ज्वलंत नाद, स्वयंभू संस्कृती, संज्ञा प्रतिष्ठान, वीरगर्जना, छावा, गर्जना ही ठाणे आणि ठाणे शहराबाहेरील ढोलताशा पथके यात सहभागी होऊन शोभा वाढवतील यात शंका नाही.
प्रत्येक वर्षी जनजागृतीपर सूत्र घेऊन या स्वागत यात्रेत चित्ररथ सहभागी होतात. यंदाही स्वच्छ भारत अभियान हे या स्वागत यात्रेचे सूत्र आहे. सकाळी पावणेसात वाजता तलावपाळी येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यानंतर कौपिनेश्वर मंदिरात नववर्षांचे पंचांगपूजन शहराचे महापौर यांच्या हस्ते करून पालखीला सात वाजता सुरुवात केली जाते. यंदाही ठाण्याचे महापौर संजय भाऊराव मोरे यांच्या हस्ते सपत्निक पंचांगपूजन झाल्यानंतर पालखी मार्गक्रमण करेल. ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाहून ही पालखी पुन्हा दुपारी मंदिरात गेल्यानंतर या यात्रेची सांगता होते.
उत्साह, इच्छाशक्ती आणि भारतीय संस्कृती जपत असल्याचा एक वेगळाच आनंद या स्वागत यात्रेतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत असतो. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकार्ंयत सर्वच वयोगट यात सहभागी होऊन चैत्रपाडव्याचे मनापासून स्वागत करतात. कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या समितीवरील पदाधिकारी नियोजनासाठी मेहनत घेत असतात. त्या मेहनतीचे फलित म्हणजे ही स्वागत यात्रा. या समितीला आता जोड हवी आहे ती तरुण कार्यकर्त्यांची. ही साथ मिळाली तर शहराबरोबरच नव्याने वसत असलेल्या घोडबंदर रोडवरूनही स्वागत यात्रा निघतील आणि ठाणे शहराप्रमाणेच ठाण्यातील भारतीय नववर्ष स्वागत यात्रा एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचेल यात शंका नाही.
गुलमोहराचा तोच वृक्ष नवी पालवी फुटल्यावर तारुण्याने बहरून जातो. असे तारुण्य माणसाला पुन्हा पुन्हा अनुभवता येत नाही. मात्र ठाण्यातील या स्वागत यात्रेतील तारुण्य हे प्रत्येक वर्षी नव्याने अनुभवायला मिळते, किंबहुना ते भविष्यात अधिकच बहरत जाईल एवढे मात्र नक्की.