ठाणे : जेवणातील अनेक वेगवेगळ्या पदार्थांमध्ये फोडणीसाठी वापरला जाणारा जिरा पालघर जिल्ह्यातील एका कारखान्यात बडीशेपचा टाकाऊ हिस्सा, लाकडी भुस्सा आणि केमिकल पावडर वापरून बनविला जात असल्याची बाब भिवंडी पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आली आहे. या बनावट जिऱ्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक करून कारखान्याला टाळे ठोकले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मुंबई महानगरात या बनावट जिऱ्याची विक्री निम्म्या भावाने सुरू होती, अशी बाब तपासात पुढे आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शादाब इस्लाम खान (३३, रा. नवलीफटा, पालघर) आणि चेतन रमेशभाई गांधी (३४, रा. कांदिवली पश्चिम) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. भिवंडी येथील शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोनजण बनावट जिऱ्याची विक्री करण्यासाठी टेम्पो घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शंकर इंदलकर यांनी पथक तयार केले होते. यामध्ये पोलिसांबरोबरच अन्न सुरक्षा अधिकारी इंद्रजीत नारायण चिलवंते यांचाही समावेश होता. या पथकाने सापळा रचून दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या टेम्पोची पाहाणी केली. त्यावेळी टेम्पोमध्ये बनावट जिरा आढळून आला. पथकाने हा जिरा पाण्यात टाकला असता, तो पाण्यात पुर्णपणे विरघळून पाण्याचा रंग काळा झाला. बडीशेपचा टाकाऊ हिस्सा, लाकडी भुस्सा आणि केमिकल पावडर वापरून हा जिरा बनविला जात असल्याचे यावेळी तपासात समोर आले. यानंतर पोलिसांनी २३९९ किलो वजनाचा आणि ७ लाख १९ हजार ७०० रुपयांचा जिऱ्याच्या साठ्यासह चार लाखांचा टेम्पो जप्त केला. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हेही वाचा…कल्याण मध्ये तरुणाची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकला

पालघर जिल्ह्यात बनावट जिऱ्याचा कारखाना

चेतन गांधी याने मे. जागृती एन्टरप्रायजेस नावाची विनापरवाना कंपनी सुरू केली होती. या कंपनीच्या नावाने पालघर जिल्ह्यातील नंडोरे तालुक्यातील नोव्हेल इंडस्ट्रीयल इस्टेट येथे कारखाना उभारला होता. याठिकाणी बनावट जिरा तयार केला जात असल्याची बाब दोन्ही आरोपींच्या चौकशीत उघड होताच पोलिसांनी कारखान्यावर धाड टाकली. तिथे बनावट जिरा तयार करण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या रंगाचे केमिकल पावडर असे एकूण ३० लाख रुपयांचे साहित्य जप्त करून कारखान्याला टाळे ठोकले आहे.

निम्म्या दराने विक्री

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट, मुंबईतील बाजारपेठ, हॉटेल आणि धाबे याठिकाणी बनावट जिऱ्याची विक्री गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होती. ५०० ते ६०० रुपये प्रति किलो दराने जिरा विकला जातो. पण, बनावट जिऱ्याची प्रतिकिलो २०० ते २५० रुपये दराने विक्री केली जात होती, असे तपासात पुढे आल्याचे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सांगितले. बनावट जिरा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल पावडर तपासणीसाठी पाठविण्यात आली असून या तपासणीनंतरच ती आरोग्यास किती घातक आहे, याबाबत समजू शकले, असेही त्यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhiwandi police raid on factory of cumin adulteration psg
First published on: 27-01-2024 at 16:42 IST