बेकायदा बांधकामे वाचवण्यासाठी ‘भूमिपूत्र कार्ड’

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोनाकाळात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत.

कारवाई करण्याबाबत ठाणे पालिका आयुक्त मात्र ठाम

ठाणे : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी स्थानिक आगरी समाजाचे अभूतपूर्व असे शक्तिप्रदर्शन ताजे असतानाच ‘भूमिपूत्र’ नावाखाली ठाणे, कळव्यातील बेकायदा बांधकामे वाचवण्यासाठी नवी मोहीम सुरू झाली आहे. ठाणे महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून शहरातील बेसुमार अशा बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पनवेलमधील भाजपचे नेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून खारेगाव, कळवा भागांतील नेत्यांनी सोमवारी आयुक्तडॉ. विपिन शर्मा यांची भेट घेत बांधकामांवरील कारवाई थांबविण्याची मागणी केली.

ठाणे महापालिकेकडून शहरातील बेकायदा बांधकामविरोधी मोहिमेत स्थानिक भूमिपुत्रांच्या बांधकामांवरच हातोडा मारला जात असल्याचा दावा या नेत्यांनी आयुक्तांच्या भेटीदरम्यान केला. मात्र, उच्च न्यायालयाचे निर्देश, शहरातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी केलेल्या तक्रारी तसेच नव्याने होत असलेल्या बांधकामांमुळे शहराचे होणारे नुकसान पाहाता ही कारवाई थांबवली जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे आयुक्तांवर दबाव आणण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्याची चर्चा आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोनाकाळात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. या बांधकामांच्या मुद्दय़ावरून टीका होऊ लागल्यानंतर आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ही बांधकामे तोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून शहरातील बेकायदा बांधकामे पाडण्याची कारवाई पालिकेकडून सुरू आहे. या कारवाईमुळे अनेक भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या आठवडय़ात कळवा पट्टय़ातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त डॉ. शर्मा यांची भेट घेऊन ही कारवाई रोखण्यासाठी त्यांच्यावर दबाब आणण्यास सुरुवात केली होती. त्यानंतरही आयुक्त डॉ. शर्मा यांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर पनवेलमधील भाजपचे नेते रामशेठ ठाकूर, लोकनेते दि. बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष तसेच ठाण्यातील शिवसेनेचे नेते दशरथ पाटील यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी आयुक्त डॉ. शर्मा यांची भेट घेऊन बेकायदा बांधकामांविरोधात सुरू असलेल्या कारवाईबाबत चर्चा केली.  शहरातील इतर बिल्डरांकडून सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांना दंड आकारून अधिकृत केले जाते. त्याच धर्तीवर भूमिपुत्रांच्या बांधकामांना संरक्षण द्यावे, अशी मागणीही शिष्टमंडळाने यावेळी केली. मात्र आयुक्तांनी कारवाई थांबवणे अशक्य असल्याचे त्यांना ठामपणे सांगितल्याचे समजते. त्यानंतर शिष्टमंडळाने महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेऊन त्यांच्याशीही याबाबत चर्चा केली.

भावनिक मुद्दा करण्याचा प्रयत्न?

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासाठी उभ्या राहिलेल्या आंदोलनाला पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांचे वडील रामशेठ ठाकूर यांचा मिळालेला राजाश्रय सर्वश्रुत होता. नवी मुंबई, पनवेल तसेच ठाणे जिल्ह्य़ातील आगरी नेते, संघटना यांना एकवटण्यासाठी प्रशांत ठाकूर दोन महिन्यांहून अधिक काळ पायपीट करताना दिसत होते. कळव्यात आगरी समाजाचे नेते दशरथ पाटील हे शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढले आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य शिवसेनेचे नगरसेवक आहेत. असे असताना रामशेठ ठाकूर यांना बेकायदा बांधकामाच्या मुद्दय़ावर थेट ठाण्यात आणत पाटील यांनी आगरी समाजाचे कार्ड खेळल्याची चर्चा आहे.

ठाणे शहरात मोठय़ा बिल्डरांना इमारतीमधील अनधिकृत बांधकामांना दंड आकारून अधिकृत केले जाते. भूमिपुत्रांनी औद्योगिकीकरणासाठी जमिनी दिल्याने ते भूमिहीन झाले. कंपन्या बंद पडल्याने त्यांची नोकरी गेली. रेती व्यवसाय बंद केला. त्यामुळे अनेकजण बिल्डरांना जमीन देऊन तिथे बांधकाम करीत आहेत. या बांधकामांना कायद्याच्या चौकटीत राहून कसे संरक्षण देता येईल, याचा विचार करावा.

– दशरथ पाटील, अध्यक्ष, लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समिती

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bhumiputra card to save illegal construction ssh

ताज्या बातम्या