ठाणे : ठाण्यातील जागेवरून भाजपमधील काही नेत्यांसह पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा असतानाच, भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल.संतोष यांनी शनिवारी ठाण्यातील प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये नाराज होऊ नका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी निवडणुकीचे काम करा, असा संदेश त्यांनी दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या ठाण्यातील जागेवर भाजपमधील काही नेत्यांसह पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे. त्याची दखल घेत पक्षाने राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल.संतोष यांना शनिवारी ठाण्याच्या मोहिमेवर पाठविले. संघटनमंत्री संतोष यांनी भाजपच्या ठाण्यातील पक्ष कार्यालयात शनिवारी सायंकाळी बैठक घेतली. ठाणे लोकसभा क्षेत्रातील आमदार, कोअर समिती आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले. भाजपला ठाण्याची जागा मिळालेली नसल्यामुळे कोणाकोणाला निवडणुकीचे काम करण्याची इच्छा नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला असता, काही पदाधिकाऱ्यांनी हात वर केले.  त्यावर, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे आहे. त्यासाठी जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे नाराज होऊ नका, मोदींसाठी निवडणुकीचे काम करा, असा संदेश त्यांनी नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना बैठकीत दिला. तसेच विजय संपादन करण्यासाठी प्रचार कसा करावा याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. ठाणे, नवी मुंबई आणि मिरभाईंदर या तिन्ही शहरातील शहराध्यक्षांनी आत्तापर्यंत आपला भागात कोणकोणते कार्यक्रम राबवले आणि पक्ष वाढीसाठी काय काम केले, याचा आढावाही त्यांनी बैठकीत घेतला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp national organization minister bl santosh message to office bearers in thane regarding the election amy
First published on: 12-05-2024 at 06:03 IST