राज्य, राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची फौज; मुख्यमंत्र्यांच्या सलग सभा

पालघर पोटनिवडणूक

वसई : पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली असून सर्वच ताकद पणाला लावली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी या पक्षाने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची जम्बो फौज प्रचारात उतरवली आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदरमधील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पालघर मतदारसंघात ठाण मांडून बसले आहे. कॉर्पोरेट जनसंपर्क, हायटेक प्रचार यंत्रणा आणि वॉर रूम बनवण्यात आल्या आहेत.

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. भाजपने मात्र ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार यंत्रणा राबवण्यात येत असून मुख्यमंत्र्यांच्या सलग सभा येथे आयोजित केल्या आहेत.

भाजपने निवडणुकीच्या प्रचारात कसलीच कसर राहू नये यासाठी देशभरातून नेत्यांची फौज या मतदारसंघात पाठवली आहे. डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. वसई महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाणच्या एका हॉटेलातून नियोजनाची सूत्रे हलविण्यात येत आहेत.

उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशातील आमदार, खासदार प्राचारात उतरवण्यात आले आहेत. भोजपुरी अभिनेते आणि दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांची प्रचारफेरी नालासोपारा येथील उत्तर भारतीयांच्या वस्तीतून आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या डहाणू, नालासोपारा आणि पालघर येथे सभा झाल्या असून आणखी तीन सभा होणार आहेत. याशिवाय निवडणुकीच्या आदल्या दिवशी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विरार येथे जाहीर सभा झाली. केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी या डहाणूत प्रचारसभा घेणार आहेत. याशिवाय मीरा-भाईंदर आणि मुंबई महापालिकेतील नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी दररोज मतदारसंघात प्रचार करत आहेत. मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता गुजराती भाषिक मतदारांसाठी तळ ठोकून आहेत.

आयारामांसाठी रणनीती

इतर पक्षांतील नाराजांना भाजपत घेण्यासाठी तसेच इतर संस्था- संघटनांचा पाठिंबा मिळवण्यासाठी खास जोर देण्यात आला आहे. यासाठी एका स्थानिक नेत्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या नेत्यांनी आतापर्यंत इतर पक्षांतील अनेक नेते गळाला लावून त्यांना भाजपत प्रवेश मिळवून दिला.

हायटेक प्रचार यंत्रणा

* भाजपने प्रचारासाठी कॉर्पोरेट जनसंपर्क कंपन्यांची नेमणूक केली आहे.

* केंद्रीय वॉर रूम बनवण्यात आली आहे. त्या वॉर रूममध्ये प्रचाराबाबतची दिशा ठरवली जाते.

* जिल्ह्य़ात विभागवार वॉर रूम तयार करण्यात आली आहे.

* विविध कंपन्यांना प्रचाराचे साहित्य बनवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.

* कामात कुठेही ढिसाळपणा येऊ  नये आणि नियोजनबद्ध काम व्हावे यासाठी प्रत्येक कामासाठी नेत्यांना स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे.

*  समाजमाध्यमांवर प्रचार करण्यासाठी स्वतंत्र पथक कार्यरत ठेवण्यात आले आहे.