ठाणे महापालिका निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात असताना येथील बाळकुम तपासणी नाक्यावर विशेष पथकाने रेंज रोव्हर या आलिशान गाडीतून तब्बल साडेचार लाखांची रोकड जप्त केली. खारेगाव परिसरातील एका बिल्डरची ही गाडी असल्याचे तपासात पुढे आले आहे. ही रोकड प्राप्तिकर विभागाच्या पथकाकडे सोपविण्यात आली असून या रकमेचा निवडणुकीशी काही संबंध आहे का, याचा तपास करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी सकाळी बाळकुम नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू होती. त्या वेळी भिवंडीहून बाळकुमच्या दिशेने जाणाऱ्या एका रेंज रोव्हर या आलिशान कारला पथकाने अडविले. या कारच्या तपासणीमध्ये चार लाख ६१ हजार ८८० रुपयांची रोकड सापडली. खारेगाव भागात राहणारे बांधकाम व्यावसायिक जगदीश पाटील यांची ही गाडी असल्याची माहिती कापुरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. टी. बरावकर यांनी दिली.

 संवेदनशील मतदान केंद्रांत घट

ठाणे महापालिका निवडणुकीदरम्यान यंदा मतदान केंद्रांच्या संख्येत ३०० ने वाढ झाली असली तरी संवेदनशील मतदान केंद्राच्या संख्येत मात्र घट झाली आहे. गेल्या वर्षी १४७१ मतदान केंद्रांपैकी ४९१ संवेदनशील व ११८ अतिसंवेदनशील मतदान केंद्रे घोषित करण्यात आली होती.

व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनवर गुन्हा

समाजमाध्यमांवर मतदारांच्या भावना भडकाविणारा मजकूर प्रसारित करण्यात आल्याची तक्रार मुंब्य्रातील इत्तेहाद वेल्फेअर ट्रस्टचे शमिन खान यांनी पालिका निवडणूक विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या आधारे व्हॉट्सअ‍ॅपवरील ग्रुप अ‍ॅडमिन तरबेज कुरेशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने राष्ट्रवादी पक्षाच्या मूळ बॅनरमध्ये फेरफार करून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा आरोप आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc election 2017 cash seized in thane
First published on: 19-02-2017 at 01:59 IST