सकाळच्या सत्रात वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक नियंत्रण विभागाचा निर्णय

ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे उड्डाणपुलाच्या मुख्य जुन्या मार्गिका मंगळवारी सकाळी ७.३० सुमारास प्रायोगिक तत्त्वावर बंद करण्यात आल्या. चाचपणीदरम्यान या मार्गावर कोपरी पूल ते तीन हात नाका उड्डाणपुलावर नितीन सिग्नलपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यातच उड्डाणपुलावर एक टेम्पो बंद पडला. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. सकाळी १०.३० वाजता जुना पूल पुन्हा सुरू करण्यात आला. त्यानंतर १०.४५ दरम्यान येथील वाहतूक कोंडी सुटली.

 कोपरी रेल्वे उड्डाणपुलावरून दिवसाला हजारो वाहने ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करत असतात. हा पूल अरुंद असल्याने त्याच्या निर्माणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मध्य रेल्वेकडून सुरू आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वीच प्रशासनाने ठाण्याहून मुंबईच्या दिशेने आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी दोन-दोनपदरी मार्गिकांचे काम पूर्ण केले आहे. या नव्या पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने गेल्या काही दिवसांपासून कोपरी पुलावर होणारी कोंडी खूपच कमी झाली. येत्या काही दिवसांत प्रशासनाकडून आता मुख्य जुन्या पुलाचे तोडकाम हाती घेण्यात येणार असून त्या ठिकाणी आता नवा पूल उभारण्याचे काम केले जाणार आहे. सुमारे एक ते दीड वर्ष या कामास लागण्याची शक्यता आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यास वाहतूक कोंडी कुठे, किती काळ होणार तसेच या कामासाठी मनुष्यबळ किती लागू शकते याची चाचपणी करण्यासाठी ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेने मंगळवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जुन्या कोपरी पुलाच्या दोन मार्गिका बंद केल्या. काही वाहने गुरुद्वारा सेवारस्ते मार्गावरून सोडण्यात आली होती, तर काही वाहनांना नव्या पुलावरून सोडण्यात आले. या बदलामुळे कोपरी पूल ते तीन हात नाका उड्डाणपुलावर सिग्नलपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच सकाळी ९ वाजेच्या सुमारास तीन हात नाका उड्डाणपुलावर एक टेम्पो बंद पडला. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. नितीन कंपनीपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

१५० वाहतूक सेवकांची मागणी

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीन हात नाका येथील उड्डाणपुलाच्या पायथ्यापासून काही मीटर अंतरावर सेवारस्त्याला जोडणारा एक उतार रस्ता तयार करण्यात आला आहे. उड्डाणपुलावरून येणारी काही वाहने थेट सेवारस्ता येथून बारा बंगलामार्गे मुंबईत वाहतूक करत होती. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला होता. या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आता १५० वाहतूक सेवक नेमले जावे, अशी मागणी वाहतूक शाखेने एमएमआरडीएकडे केली आहे.