बिल्डर सूरज परमार आत्महत्येच्या निषेधासाठीच्या कृतीने नागरिक वेठीला
ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी बांधकाम व्यावसायिकांनी काढलेल्या मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालय ते महापालिका या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

भ्रष्ट व्यवस्थेमुळेच परमार यांनी आत्महत्या केल्याचे समोर येऊ लागल्याने गृहनिर्माण व्यवसायाला लागलेल्या किडीचा समूळ नायनाट करण्यासाठी एमसीएचआय संघटनेच्यावतीने मंगळवारी ठाणे महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. बिल्डर, वास्तुविशारद व त्यांचे कर्मचारी तसेच व्यापारी संघटना मोठय़ा संख्येने सहभागी झाल्याने या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे ऐन सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांना या कोंडीचा सामना करावा लागला.

गेल्या आठवडय़ात परमार यांनी आत्महत्या केली. त्यांच्या कारमध्ये पोलिसांना एक १८ पानाचे पत्र सापडले असून त्यामध्ये त्यांनी काही राजकीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे. या पत्रामध्ये महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली असून त्याचप्रमाणे राजकीय धोरणांविषयी आक्षेप नोंदविले आहेत.

या मोर्चामध्ये बिल्डर, वास्तुविशारद व त्यांचे कर्मचारी तसेच व्यापारी संघटना सहभागी झाल्याने मोर्चेकरांचा आकडा सुमारे सात ते आठ हजारांच्या घरात होता. मोच्र्यात सहभागी होणाऱ्यांकरिता बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. या बसगाडय़ा उथळसर भागात उभ्या करण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

परिणामी, उथळसर, मीनाताई ठाकरे चौक, सेंट्रल मैदान आदी परिसरांत वाहतूक कोंडी झाली. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय, टेंभीनाका, तलावपाळी, गडकरी रंगायतन, दगडी शाळा, चंदनवाडी, महापालिका मुख्यालय या मार्गे पायी मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावरील भागांमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. महापालिका मुख्यालयाच्या पाठीमागील गेटजवळ या मोच्र्याचे विसर्जन करण्यात आले.

तसेच संघटनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यामध्ये बांधकाम प्रकल्प मंजुरीच्या धोरणांमध्ये बदल करण्यासंबंधीची मागणी करण्यात आली आहे.