या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलेट ट्रेन प्रकल्पबाधित शेतकरी नाराज; दर वाढवून देण्याची शेतकरी संघाची मागणी

पालघर: देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला पालघरमधील शेतकरी जमीन द्यायला तयार असले तरी त्यांना जमिनीचा योग्य मोबदला देत नसल्याचा आरोप प्रकल्पात जमीन बाधित होणाऱ्या केळवे रोड पंचक्रोशी शेतकरी संघाकडून होत आहे. योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे.

केळवे रोड, रोठे, कमारे, वरकुंठी अशा पंचक्रोशी शेतकरी संघाने २०१८ पासून ते आतापर्यंत जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी विविध स्तरांवर पत्रव्यवहार केल्यानंतरही प्रशासन या शेतकरी संघाला उपेक्षित ठेवत असल्याचे शेतकरी संघातर्फे सांगितले जात आहे. गुजरातमधील नवसारीसारख्या ठिकाणी जर जमिनीला मोठा मोबदला मिळत असेल तर पालघर जिल्ह्यात निश्चितच चांगला मोबदला द्यावा अशीही मागणी या शेतकरी संघाने केली होती. मात्र जमिनीचे मूल्यांकन ठरवणाऱ्या मूल्यांकन समितीला दर वाढविण्याबाबत शेतकऱ्यांचे म्हणणे मान्य नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

जमिनीची भौगोलिक स्थिती, मोक्याची जमीन याची उपलब्धता पाहून या पाचही गावाच्या शेतकऱ्यांना किमान भाव मिळणे अपेक्षित असताना शासनाच्या आडमुठे धोरणाचा फटका या शेतकऱ्यांना बसत आहे, असे हे शेतकरी सांगत आहेत. यामुळे बुलेट प्रकल्पात भूसंपादन प्रक्रियेत दिरंगाई होत आहे व याचा फटका प्रकल्पाला बसत आहे.

भूसंपादन कायदा २०१३ नुसार या परिसरात झालेल्या जमिनीचे सर्वाधिक व्यवहार या संघाने निदर्शनास आणून दिल्यानंतरही शासनाने किंवा प्रशासनाने ते लक्षात घेतलेले नाही. ते व्यवहार प्रशासनाने अमान्य केले. याउलट प्रशासनाने वारंवार भूसंपादनविषयी जमिनीवर बैठका घेऊन एक प्रकारचा दबाव आणून जो दर दिला आहे तो घेण्यास भाग पडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हा अन्याय असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कायदा काय म्हणतो…

प्रकल्पबाधित जमिनीचा ठरवलेला व देण्यात येणारा मोबदला शेतकऱ्यांना मान्य नसल्यास प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी हा मोबदला वाढवून मिळण्यासाठी जिल्हाधिकारी (लवाद) यांच्याकडे अपील करणे अपेक्षित आहे. अपील सुनावणीत वाटाघाटीने जमीन मोबदला वाढवून मिळू शकतो. तशी तजवीज संपादन कायद्यात आहे.

जमिनीचे आता दिलेले दर अत्यल्प व अन्यायकारक आहे. हा दर वाढवून येथील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. – विश्वास जगताप, शेतकरी प्रतिनिधी

दर वाढवून मिळण्यासाठी जिल्हा लवादाकडे तरतूद आहे. दर वाढवून मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी तेथे दाद मागावी. – धनाजी तोरस्कर, सक्षम प्राधिकारी तथा प्रांताधिकारी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bullet train project government land allegation paying proper compensation akp
First published on: 28-01-2021 at 01:12 IST