परमारपुत्र अभिषेक यांचा समावेश; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई

घोडबंदर येथील भाईंदरपाडा भागातील जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून जमीन बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेले ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांचे पुत्र अभिषेक यांच्यासह दीपक देढीया आणि धीरज शहा या तिघा बांधकाम व्यावसायिकांविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

घोडबंदर येथील कासारवडवली भागात नयना भोकरे या राहत असून, त्यांचे पती प्रकाश आणि पुतण्या भगवान यांची भाईंदरपाडा भागात जमीन आहे. या दोघांच्या निधनानंतर त्या जमिनीचे अधिकार नयना यांना प्राप्त झाले आहेत.

दरम्यान, बांधकाम व्यावसायिक दीपक देढीया, धीरज शहा आणि अभिषेक परमार यांनी महादेव काशीनाथ भोकरे यांच्याशी संगनमत करून जमिनीचे कुलमुखत्यारी असल्याचे भासवून शासकीय कार्यालयात जमिनीच्या विक्री परवानगीसाठी अर्ज केला होता. तसेच खोटे जबाब देऊन जमिनीच्या विक्रीसाठी परवानगी मिळविली आणि जमिनीच्या खरेदी-विक्रीची बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर फसवणूक करून मान्यतापत्रावर सह्य़ा घेतल्या. तसेच जमिनीचा ताबा दिला नाहीतर वाईट परिणाम होतील, अशी धमकी अनोळखी व्यक्तींमार्फत दिली, असे नयना यांनी तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी अभिषेक यांच्यासह दीपक देढीया आणि धीरज शहा या तिघा बांधकाम व्यावसायिकांविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

  • बनावट कागदपत्रांद्वारे जमीन हडपल्याप्रकरणी नयना यांनी ठाणे न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता. त्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
  • न्यायालयाच्या आदेशानंतर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.