केंद्र सरकारने अमृत योजना, स्मार्ट सिटी आणि प्रधानमंत्री आवास योजनांची नुकतीच घोषणा केली असून या योजनांमध्ये ठाणे महापालिकेचा समावेश होण्याकरिता आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर त्यांनी स्वतंत्र विशेष कक्ष स्थापन करून अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये योजनांमध्ये समावेश होण्याकरिता काय करायला हवे, याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत. त्यामुळे केंद्राच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरु केल्याचे चित्र आहे.
अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या अधिपत्याखाली या विशेष कक्षाची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये नगर अभियंता रतन अवसरमोल, उपनगर अभियंता अनिल पाटील, कैलास मुंबईकर, रविंद्र खडताळे, दत्तात्रय मोहिते, वृक्ष प्राधीकरण विभागाचे उपायुक्त आदी अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.  या अधिकाऱ्यासोबत आयुक्त जयस्वाल यांनी नुकतीच बैठक घेतली. पाणी पुरवठा, भुयारी गटारे, पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी योजना, रस्त्यावरील पदपथ, इंधन विरहीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मल्टीलेव्हल पार्किंग, लहान मुलांसाठी हरित पट्टे, मनोरंजन केंद्रे आदी कामांचा समावेश अमृत योजनेत करण्यात आला असून या योजनेमध्ये देशातील एकूण ५०० शहरांचा समावेश होणार आहे.