मध्य रेल्वेच्या नव्या वेळापत्रकात शटल सेवांवर भर; बदलापूर आणि टिटवाळ्यासाठी प्रत्येकी एकच शटल
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने उपनगरीय रेल्वे सेवेत ४० नव्या लोकल फेऱ्या सुरू झाल्या असून त्यामध्ये ठाणेपुढील स्थानकांसाठी एकूण ११ नव्या शटल फेऱ्यांचा समावेश आहे. यामुळे कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र त्याच वेळी कल्याणच्या पुढे बदलापूर आणि टिटवाळा या स्थानकांसाठीच्या प्रत्येकी एक शटल सेवा सोडता कर्जत, कसाऱ्यासाठी शटलची व्यवस्था न करण्यात आल्याने या मार्गावरील प्रवाशांचा अपेक्षाभंग झाला आहे.
२६ जानेवारीचा मुहूर्त साधत मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेमध्ये नव्या ४० फेऱ्यांची सुरुवात केली असून मध्य रेल्वेच्या मार्गावर त्यापैकी ११ शटल सेवांची सुरुवात झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर सर्वाधिक २२ फेऱ्या तर हार्बर मार्गावर ७ फेऱ्यांची सुरुवात करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने ठाण्यापलीकडच्या स्थानकातील शटल सेवेचे महत्त्व लक्षात घेऊन पहिल्यांदाच इतक्या फेऱ्या सुरू केल्याने प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले असले तरी या शटल सेवांच्या वेळांसदर्भात मात्र प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. शिवाय कर्जत, कसारा, खोपोली यांसारख्या भागांमधून येणाऱ्या प्रवासांना या शटल सेवांचा कोणताच लाभ घेता येणार नसल्याने त्याविषयीही प्रवाशांमध्ये असंतोष आहे.
शटल सेवांचे महत्त्व लक्षात घेऊन तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी २००८ मध्ये ठाण्यातून ७४ शटल फेऱ्यांची घोषणा केली होती. मात्र या घोषणेची अंमलबजावणीच केली जात नव्हती. रेल्वे प्रशासनाने शटल गाडय़ांमुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ांना फटका सहन करावा लागेल तसेच सीएसटीकडील प्रवास विलंबाचा होईल, अशी कारणे त्यासाठी पुढे केली जात होती. या पाश्र्वभूमीवर रेल्वेने मध्य रेल्वे मार्गावर ठाण्याच्या पलीकडे शटल सेवा सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी कल्याणपलीकडील गर्दीच्या स्थानकांमधील
प्रवाशांच्या हाती फारसे काही लागलेले नाही. दरम्यान, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे प्रवक्ते राजेश घनघाव यांनीही नाराजी व्यक्त केली. ‘ठाण्यापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रामुख्याने कर्जत, कसारा, खोपोली, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा आणि शहाड या स्थानकांतील प्रवासी असतात.त्यांना सर्वाधिक गरज असली तरी नव्या वेळापत्रकामध्ये या भागाला केवळ दोन शटल देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सकाळी आठची बदलापूर आणि सकाळी ९.५४ची टिटवाळा या दोन्हीचा फायदा कर्जत, कसाऱ्याकडील प्रवाशांना होत नसल्याने या शटलचा मार्ग वाढवण्याची गरज आहे. तर टिटवाळा ते आसनगाव दरम्यान शटलची तशी आवश्यकता नसताना फेरी वाढवून दाखवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केला आहे,’ असे ते म्हणाले.
मध्य रेल्वेच्या नव्या फेऱ्या
* स. ८ वाजता बदलापूर-ठाणे
* सायं. ७.३४ ठाणे-बदलापूर
* सकाळी ९.५४ टिटवाळा-ठाणे
* स. ८.५९ ठाणे-टिटवाळा
* स. १०.४१, दु. १.२० कल्याण-कुर्ला
* दु. १२.०४, दु. २.३२ कुर्ला-कल्याण
* सायं. ६.५८ कल्याण-ठाणे
* सकाळी १०.०२ ठाणे-कल्याण
* स. ५.०७ टिटवाळा -आसनगाव
* सायं.५.५९ विद्याविहार-कल्याण