तुम्ही प्रवासात आहात. एक महत्त्वाचा फोन करायचा आहे, पण मोबाइलची बॅटरी पूर्णपणे ‘डाऊन’ झाली आहे.. अशा परिस्थितीत काय करू नि काय नको, अशी आपली अवस्था होते. पण लवकरच तुमची ही समस्या मिटणार आहे. तुम्ही जितके अंतर चालाल, तितकी अधिक वीजनिर्मिती करणारे एक तंत्रज्ञान रॉयल महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. चपलेत बसवलेल्या प्लेट्सच्या मदतीने पिझो इलेक्ट्रिसिटी पद्धतीने वीजनिर्मिती करणारा हा प्रकल्प भविष्यात केवळ मोबाइलच नव्हे तर, अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी ‘ऊर्जादायी’ ठरणारा आहे. 

डोंबिवली युवक एज्युकेशनल ट्रस्ट संचालित रॉयल महाविद्यालयातील बारावीच्या विज्ञान विभागातील इलेक्ट्रिकल विषयातील सूरज तिवारी आणि हर्षित राय या विद्यार्थ्यांनी साकारलेला हा प्रकल्प येत्या गुरुवारी २९ जानेवारीला होणाऱ्या तालुकास्तरीय प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. बारावीच्या पुस्तकातील ‘पिझो इलेक्ट्रिसिटी’विषयीच्या माहितीच्या आधारे शिक्षक नलीन मौर्य यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघांनी हे तंत्रज्ञान तयार केले आहे.
प्रत्येक व्यक्ती दिवसाला सरासरी ७ हजार फूट चालते. ती ऊर्जा या संयंत्रात वापरण्यात आली आहे. चपलेत बसविण्यात आलेल्या प्लेटस्वर चालल्यानंतर दाब येताच त्यातून निर्माण होणाऱ्या विजेचे एसी टू डीसीमध्ये रूपांतर करून ती साठवून ठेवली जाते. प्रत्येक पावलाला ३० व्होल्टची वीजनिर्मिती होते, असे या तंत्रज्ञानाचे स्वरूप आहे. विशेष म्हणजे, चपलेतील सोलच्या खाली प्लेट्स टाकून अशी ‘वीजनिर्मिती’ सुरू करता येत असल्याने त्यासाठी कोणत्याही विशेष चपलांची वा बुटांची गरज नाही. ‘विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे प्रकल्प खरोखरच वाखाणण्यासारखे असून त्यांच्या कल्पनाशक्तीला सलाम आहे. त्यांच्या या प्रेरणेने आम्हा शिक्षकांनाही एक वेगळीच ऊर्जा मिळते. त्यांना आम्ही सदैव सहकार्य करत राहू,’ असे महाविद्यालयाचे प्रा. डी. एच. तिवारी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘स्मार्ट फोनचा वापर हल्ली वाढला आहे, मात्र बॅटरी चार्जिग ही त्यातील सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे ‘पिझो’ तत्त्वाद्वारे वीजनिर्मिती करून त्यावर उपाय शोधावा, या विचाराने हा प्रकल्प आम्ही साकारला. केवळ चप्पलपुरतेच मर्यादित न राहता रस्त्यावरील वाहने, नृत्याचे व्यासपीठ, पदपथ, जॉिगग ट्रॅक याबरोबरच रेल्वे स्थानक येथे हजारो प्रवासी दररोज चालतात. त्यातून निर्माण होणारी ऊर्जाही आपल्याला यात वापर करता येईल.’
हर्षित व सूरज