प्रभू येशूचा जन्मदिवस २५ डिसेंबर हा नाताळचा सण म्हणून जगभर साजरा केला जातो. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच या सणाची चाहूल लागते आणि तयारी सुरू होते. वसईत ख्रिस्ती बांधव हे महिनाभर आधीपासून नाताळची तयारी करत असतात. आळी-आळींत उत्सहाचे वातावरण असते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच या सणाच्या पूर्वतयारीमध्ये हातभार लावत असतात. मग ही तयारी कशाप्रकारे केली जाते हे पाहूया.
नाताळ पूर्वीच्या महिन्याला एडव्हेंट म्हणजेच आगमन काळ असे संबोधले जाते. हा आगमन काळ आणि त्याची तयारी दोन भागात विभागलेली आहे.
नाताळ पूर्वीच्या चार रविवारी ख्रिस्ताचे दुसरे आगमन होते, तर त्यानंतरच्या आठवडय़ात ख्रिस्ताचे नाताळमधील आगमन सुरू होते. यादरम्यान अष्टदिन भक्ती केली जाते.
प्रत्येक रविवारी सकाळी प्रार्थनेदरम्यान पानांची माळ बनवून ती गोलाकार ठेवून त्यात जळती मेणबत्ती ठेवली जाते, युरोपमध्ये लॉरेल झाडाच्या पानांची माळ बनवली जाते. पहिल्या, दुसऱ्या आणि चैथ्या रविवारी जांभळ्या रंगाची मेणबत्ती लावली जाते. तर तिसऱ्या दिवशी गुलाबी रंगाची मेणबत्ती लावण्यात येते. जांभळा रंग हा पश्चत्तापाचा आहे. केलेल्या चुकांची सुधारणा करा, असा संदेश यातून देण्यात येतो, तर गुलाबी रंग हा आनंदाचा म्हणून दर्शवला जातो. नाताळ सणाचे जल्लोषात स्वागत करा, असा संदेश यातून देण्यात येतो. फादर फ्रान्सिस दिब्रिटो सांगतात की, ‘‘पहिली वात ही द्रष्टय़ांची आठवण म्हणून लावली जाते. येशूच्या जन्मापूर्वी अनेकांनी भाकिते केली होती की कोणी मसिहा या पृथ्वीतलावर येईल, हे सांगितलेल्या सर्वाची आठवण याप्रसंगी काढली जाते. दुसऱ्या वातेला बेथलेहमच्या यात्रेची वात, असे म्हटले जाते. मेरी गर्भवती असताना ती बेथलेहम गावी जाते. तिच्या या प्रवासाची स्मृती म्हणून ही वात लावण्यात येते. तिसरी वात ही मेंढपाळाची वात असते. कारण, येशूच्या जन्माची पहिली बातमी मेंढपाळाला देण्यात येते. शेवटची वात ही देवदूतांच्या नावाने लावली जाते. कारण त्यांनी जगाला ख्रिस्ताच्या जन्माची गोड बातमी दिली आणि सर्वाना आनंद करण्यास सांगितले.’’ यानिमित्ताने चर्चमध्ये विशेष प्रार्थना म्हटली जाते. ‘आम्ही येशूच्या आगमनाची तयारी करत आहोत. आमच्या मनातील पापाचा अंध:कार दूर कर आणि या जगात शांततेचे वातावरण प्रस्थापित कर.’ अशा पद्धतीच्या प्रार्थना म्हटल्या जातात.
चर्चमधील तरुण मंडळी एकत्र येऊन चर्चमध्ये गाईचा गोठा बनवतात. यातून ते आपली सर्जनशीलता दाखवतात, तसेच गावातील तरुण मुले चर्चमधील कपडे, साहित्य घेतात आणि चर्चमध्ये प्रार्थना करून मग ते सायंकाळी ख्रिस्त आगमनाची गाणी गाण्यासाठी गावागावांत जातात, तेथील आवारात गाणी गातात. त्यांच्या सोबत असणारा सांताक्लॉज हा मुलांना चॉकलेट वाटतो.
घरोघरी केली जाणारी तयारी
येशूचे आगमन होणार म्हणून संपूर्ण घर, अंगण, परस स्वच्छ करून रंगरंगोटी केली जाते. घरातील प्रत्येकासाठी नवीन कपडे खरेदी केले जातात. सध्या तर सर्वाचा कल हा पाश्चिमात्य कपडय़ांकडेच असलेला दिसतो. पण काही लोक पारंपरिक साडीदेखील परिधान करतात, पुरुष लाल टोपी घालतात. त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरी किंवा अंगणात नाताळ गोठा बनवण्यात येतो. बिशप हाऊसमधून नाताळ गोठय़ासाठी विषय दिला जातो. प्रत्येक पॅरीशसाठी (धर्मग्राम) वेगळा विषय असतो. विविध सामाजिक विषयातून नाताळ गोठय़ाचा देखावा साकारला जातो. नाताळ गोठे बनवण्यात लहान मुले आणि तरुण मंडळी फारच उत्सुक असतात. गावा-गावांत नाताळ गोठय़ांच्या स्पर्धाही होतात. नाताळनिमित्त विविध स्पर्धाचे म्हणजे विविध खेळांचे, चित्रकला, निबंध, वक्तृत्व इत्यादींचे आयोजन केले जाते, त्याच्या नियोजनाची तयारी करण्यात येते.
ख्रिस्त जन्म आगमनाची वर्दी देण्यासाठी गावागावात फिरून संगीत आणि गाण्यांद्वारे ख्रिस्त येत आहे, तयारीला लागा, आनंद साजरा करा हे सांगितले जाते. त्याला कॅरल सिंगिंग असे म्हणतात. नाताळच्या दोन आठवडे आधीपासून कॅरल सिंगिंगला सुरुवात होते.
तरुणांचे पथक विविध गाणी म्हणत गावागावात फिरतात. कॅरल सिंगिंगमध्ये मराठी गाण्यांबरोबरच इंग्रजी, हिंदी आणि लॅटिन भाषांमध्येही गाणी म्हटली जातात. त्यांच्यासोबत बँड आणि सांताक्लॉजही असतात, असे वसईतील डॉ. डोनिल्डा काव्र्हालो यांनी सांगितले.
घरोघरी लाडू, करंज्या, चिवडा, शंकरपाळी, फुगे असे पदार्थ बनवतात. त्याचबरोबर मावा केक, स्पाँज केक, प्लम केक बनवतात. घरांना रोषणाईने सजवले जाते. खिडकीला किंवा दारासमोर चांदणी लावली जाते. काही लोक ही चांदणी घरीच बनवतात. अशी मान्यता आहे की रात्री तारा चमकला आणि येशूचा जन्म झाला म्हणून घरोघरी चांदणी किंवा तारा दिवाळीतील कंदिलाप्रमाणे लावण्यात येतो. लहान मुले दाराजवळ सॉक्स टांगतात, कारण त्यांना वाटते की सांतक्लॉज त्यांना भेटवस्तू देईल. नाताळ सणाची सुरुवात ही डिसेंबरपासून होते आणि नवीन वर्षांच्या स्वागतापर्यंत हा आनंदोत्सव सुरू राहतो.
दिशा खातू – @Dishakhatu