वेध विषयाचा छ येशुजन्माच्या स्वागतासाठी चर्च सजले!

आठवडाभर आधीपासूनच चर्चमध्ये येशुख्रि्रस्ताचे जन्म प्रसंग पुतळ्यांच्या माध्यमातून रेखाटण्यात आले आहेत.

ठाण्यातील सेंट जेम्स चर्च सजवण्यात आला आहेत.


गुलाबी थंडीची दुलई पसरु लागताच प्रत्येकाला नाताळ आणि त्याच्या जोडीला येणाऱ्या ‘थर्टी फस्ट’चे वेध लागतात. नाताळ हा ख्रिस्ती बांधवांचा सण असला तरी सारे समाज घटक एकत्र येऊन हा सण साजरा करतात. त्यामुले एकप्रकारचा उत्सवी माहोल या काळात निर्माण होतो. ठाण्यातही ख्रिस्तीबांधवांना शुभेच्छा देण्याबरोबरच त्यांच्या उत्साहात सहभागी होत अनेक ठाणेकर नाताळचा आनंद लुटतात. या निमित्ताने शहरातील बाजारपेठेतही ख्रिसमस माहोल निर्माण झाला आहे. चर्चेसमधील नाताळ, शहरातील वेगवेगळ्या बेकरीमधील नाताळ निमित्ता तयार केल्या जाणारे केक आणि नाताळच्या स्वागतासाठी मॉल प्रशासनाने केलेली तयारी सगळेच लक्षवेधी ठरत आहेत. त्या बरोबरच येणाऱ्या थर्टीफस्टचा माहोलही शिगेला पोहचला आहे. नाताळच्या निमित्ताने आणि विकेण्डच्या जोड सुट्टय़ांचा फायदा घेत अनेक ठाणे, कल्याण-डोंबिवलीकरांनी गोवा, महाबळेश्वर, माथेराने आणि आलिबागसारख्या सहलीच्या ठिकाणांची निवड केली आहे. तर ठाणे शहरातील अनेक तरूणांनी आपल्या सोसायटी आणि गच्चीवर पार्टीचे बेत आखले आहेत. नाताळच्या आणि थर्टी फर्स्टच्या या तयारी आणि सेलिब्रेशनचा घेतलेला वेध विषयाचा..

एकत्र स्वागताची १९० वर्षांची परंपरा
सेंट जेम्स चर्च, ठाणे
नाताळ सणाच्या निमित्ताने घरांमध्ये सजावट करण्याची लगबग सुरू असली तरी ठाण्यातील काही चर्चसुद्धा सजवण्यात आली आहेत. ठाण्यातील सेंट जेम्स चर्च दरवर्षीप्रमाणे सजवण्यात आलेले आहे. आठवडाभर आधीपासूनच चर्चमध्ये येशुख्रि्रस्ताचे जन्म प्रसंग पुतळ्यांच्या माध्यमातून रेखाटण्यात आले आहेत. चर्चमध्ये ख्रिसमस ट्री बनवण्यात आले असून नाताळ सणाच्या दरम्यान हे ख्रिसमस ट्री सजवण्यात येणार आहे.
नाताळ सणाच्या एक दिवस आधी चर्चमध्ये मिड नाइट हा कार्यक्रम साजरा होत असतो. या कार्यक्रमात रात्री साडेदहाच्या सुमारास सर्व सदस्य एकत्र येऊन येशुख्रिस्ताची इंग्रजी भाषेत प्रार्थना सुरू करतात. रात्री १२ वाजता येशुख्रिस्ताच्या जन्म वेळेपर्यंत प्रार्थना संपवून चर्चमध्ये सर्व सदस्यांच्या उपस्थितीत केक कापून नाताळ सणाला प्रारंभ होतो. २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता चर्चच्या सदस्यांची मराठी भाषेतील प्रार्थनेसाठी पुन्हा गर्दी होते. प्रार्थनेनंतर लहान मुलांमध्ये आवडीचा असलेल्या सांताक्लॉजचे आगमन होते आणि सदस्य केक कापून नाताळच्या शुभेच्छा एकमेकांना देऊन आनंद साजरा करतात. गेली १९० वर्षे सेंट जेम्स चर्चमध्ये सदस्यांनी एकत्र येऊन सणाला प्रारंभ करण्याची परंपरा सुरू आहे, असे सेंट जेम्स चर्चचे फादर राजेंद्र भोंसले यांनी सांगितले.
चर्चमधील कॅरलचे महत्त्व
नाताळ सणाच्या दहा दिवस आधी चर्चमधील काही सदस्य इतर सदस्यांच्या घरी जाऊन येशुख्रिस्तांची गाणी म्हणतात. या प्रथेला कॅरल असे म्हटले जाते. चर्चचे एकूण ८०० सभासद असल्याने दहा दिवसांत प्रत्येकाच्या घरी पोहचणे शक्य नसते. नाताळच्या दिवशी ज्या सदस्यांच्या घरी जाणे शक्य होत नाही त्या सदस्यांसाठी चर्चमध्ये कॅरल सादर केले जाते.
सेंट जेम्स चर्च येथे क्रिसमस ट्री दिवस साजरा करण्यात येतो. चर्चमध्ये तयार केलेल्या ख्रिसमस ट्री सर्व सदस्य, लहान मुले एकत्र येऊन जास्तीत जास्त आकर्षकरीत्या सजवण्याचा प्रयत्न करतात.

पंधरवडय़ापासून उत्सव
सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च
ठाण्यात ऐतिहासिक वैभव असलेल्या सेंट जॉन बाप्टिस्ट चर्चमध्ये नाताळ सणाला प्रारंभ झाला असून दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम नाताच्या निमित्ताने साजरे केले जातात. दहा दिवसांपूर्वी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम चर्चतर्फेआयोजित करण्यात आले होते.यात लहान मुलांनी येशुख्रिस्तांच्या जन्मावर आधारित नाटकाचे सादरीकरण केले. नाताळ सणाच्या मुख्य दिवसाच्या एक दिवस आधी चर्चमध्ये फादर आणि सदस्यांच्या उपस्थितीत मिसा होतो. त्यात रात्री दहा वाजता सर्वजण एकत्रितपणे येशुख्रिस्ताची प्रार्थना म्हणतात. यानंतर रात्री १२ वाजता क्रिब या कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाते. रात्री चर्चमध्ये केकचे वाटप करून एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या जातात. क्रिब या कार्यक्रमात पोप फ्रान्सिस यांनी सांगितलेल्या प्रेम आणि दया या संदेशाचे कथन केले जाते. गेली ४५० वर्षे सेंट जॉन बाप्टिस्ट चर्चमध्ये नाताळ सर्व सदस्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा केला जातो, असे फादर ऑल्विन द सिल्वा यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Church ready to welcome the birth of jesus

ताज्या बातम्या